साखरेच्या दरात प्रति क्विंटल ८० रुपयांनी घसरण

राजकुमार चौगुले
बुधवार, 14 मार्च 2018

कोल्हापूर - साखरेच्या दरातील घसरण कायम असून, सोमवारी (ता. १२) साखरेच्या दरात पुन्हा क्विंटलला ८० रुपयांनी घसरण झाल्याने आता निर्यात शुल्क घटविण्याचा निर्णय जाहीर करून तातडीने अंमलबजावणी क्रमप्राप्त झाली आहे.

कोल्हापूर - साखरेच्या दरातील घसरण कायम असून, सोमवारी (ता. १२) साखरेच्या दरात पुन्हा क्विंटलला ८० रुपयांनी घसरण झाल्याने आता निर्यात शुल्क घटविण्याचा निर्णय जाहीर करून तातडीने अंमलबजावणी क्रमप्राप्त झाली आहे.

हंगाम संपायच्या आत हा निर्णय झाल्यास शिल्लक साखरेचा बोजा न राहता ही साखर निर्यात होऊ शकते. त्याचा सकारात्मक परिणाम साखरेचे दर वाढण्यावर होणार आहे. केंद्रीय स्तरावरून साखरेचे निर्यात शुल्क हटविण्याच्या निर्णयाची निश्‍चिती झाल्याचे सूत्रांचे म्हणणे असले तरी अद्याप तो निर्णय जाहीर झाला नाही. निर्णय जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्यास पुन्हा वेळ जाणार आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या उत्पादनात सुमारे १५ टक्‍क्‍यांची वाढ झाली. उत्तर प्रदेशातूनही साखरेचे उत्पादन वाढल्याने यंदा शिल्लक साखरेचा धोका आहे. सरकारने जर २० टक्के निर्यात शुल्क हटविल्यास कारखानदारांना २१०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर साखरेस मिळू शकतो. स्थानिक बाजारात तीन हजार रुपयांपर्यंतचा दर साखर कारखान्यांना मिळतो.

या दरालाही साखर विकण्यास कारखानदार तयार नाहीत. पण, सगळंच नुकसान सोसण्यापेक्षा काही टक्के साखर कमी दराने विकून उर्वरित साखरेला चांगला दर मिळविणेही कारखान्यांना शक्‍य असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

शिल्लक साखरेमुळे सगळ्याच साखरेला दर कमी मिळण्यापेक्षा दहा टक्के साखर कमी दरात विकून उर्वरित ९० टक्के साखरेला चांगला भाव कारखाने मिळवू शकतात, असाही एक मतप्रवाह तज्ज्ञांतून व्यक्त होत आहे. 

हंगाम सुरू झाल्यापासून केंद्र साखर धोरणात अनाकलनीय बदल करते. दराच्या बाबतीत दूरगामी धोरण ठेवत नाही. यामुळे उद्योगाची हानी होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. भविष्याचा वेध घेऊन काही काळ स्थिर राहणारे ठोस धोरण केंद्राने ठरवावे.
- रघुनाथदादा पाटील, 

   अध्यक्ष, शेतकरी संघटना

भविष्याचा विचार हवा
यंदाची साखर हंगामाची स्थिती बिकट आहे. पुढील वर्षाची उसाची लागवड पाहता पुढील वर्षीही अशी स्थिती राहणार असल्याची शक्‍यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. यंदा चाळीस लाख टन साखर शिल्लक असल्याचा दबाव असल्याने दरात आताच घट झाली. आताही जर शासन व कारखाना पातळीवरून योग्य निर्णय नाही झाले तर पुढील वर्षी आणखी स्थिती अडचणीची होऊ शकते. यंदाचा हंगाम संपण्याअगोदर शासन व कारखान्यांनीही तातडीने पावले उचलण्याची गरज या उद्योगातून व्यक्त होत आहे. 

कारखान्यांनी सगळ्याच साखरेची विक्री तोट्यात होऊ नये, याबाबत दक्षता बाळगणे गरजेचे आहे. संपूर्ण साखर तोट्यात विकण्यापेक्षा काही टक्के कमी दराने विकून उर्वरित साखरेला जादा दर मिळणे शक्‍य आहे.
- विजय औताडे, 

   साखरतज्ज्ञ

Web Title: Kolhapur News 80 Rs decline in sugar rate