रिक्षाच्या धडकेत बालक मृत्‍युमुखी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

कोल्हापूर - भोसलेवाडी परिसरात आज दुपारी भरधाव रिक्षाने बालकास दहा फूट फरफटत नेले. त्यात बालक गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष संदीप भाकरे (वय ५) असे त्याचे नाव आहे. याबाबत रिक्षाचालकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

कोल्हापूर - भोसलेवाडी परिसरात आज दुपारी भरधाव रिक्षाने बालकास दहा फूट फरफटत नेले. त्यात बालक गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष संदीप भाकरे (वय ५) असे त्याचे नाव आहे. याबाबत रिक्षाचालकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गगनगिरी हौसिंग सोसायटी, भोसलेवाडी येथे संदीप भाकरे भाडेतत्त्वावर कुटुंबासोबत राहतात. त्यांना श्रद्धा (वय ९) आणि मुलगा आयुष (५) अशी दोन मुले आहेत. ते टेंपोचालक आहेत. सकाळी ते राधानगरीला मालवाहतुकीचे भाडे घेऊन गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांची पत्नी घरात स्वयंपाक करीत होत्या. त्यांची दोन्ही मुले मित्रांबरोबर शेजारील दुकानाच्या दारात खेळत होती. दरम्यान, भोसलेवाडीकडून कदमवाडीच्या दिशेने एक रिक्षा भरधाव वेगाने आली. चालकाने खेळणाऱ्या आयुषला जोराची धडक देत सुमारे दहा फूट फरफटत नेले. त्यात आयुष गंभीर जखमी झाला. जोराचा आवाज ऐकून त्याची आई किंचाळत बाहेर आली. रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या आयुषला पाहून त्यांनी मोठमोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली, तसे परिसरातील नागरिक जमा झाले. आईने त्याच रिक्षातून त्याला उपचारासाठी गल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथून रिक्षाचालक निसटला. 

जखमी आयुष कधी शुद्धीवर येतो, याची वाट पहात होते. डॉक्‍टरांकडे त्यांच्यासह परिसरातील नागरिक विचारणा करत होते. मात्र, जे घडायला नको होते, त्याची बातमी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या कानावर पडली. तसा त्याच्या आई-वडील व नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. तेथून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये आणला. येथेही नातेवाइकांकडून आक्रोश केला जात होता. आयुष बालवाडीच्या वर्गात शिकत होता. 

Web Title: Kolhapur News accident near Bhosalewadi