आधार पडताळणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल

डॅनियल काळे
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर -  रेशन व्यवस्थेत संगणकीकरण केल्यामुळे या व्यवस्थेतील काळा बाजार कायमचाच हद्दपार होणार आहे. शासनाने सुरू केलेल्या आधार पडताळणीत (Aadhaar enabled public Distribution system) कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला.

कोल्हापूर -  रेशन व्यवस्थेत संगणकीकरण केल्यामुळे या व्यवस्थेतील काळा बाजार कायमचाच हद्दपार होणार आहे. शासनाने सुरू केलेल्या आधार पडताळणीत (Aadhaar enabled public Distribution system) कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला. या पद्धतीत जिल्ह्यातील अन्न सुरक्षाअंतर्गत येणारी सुमारे साडेपाच लाख कार्डाची नोंदणी पूर्ण झाली.

२५ लाख लोकसंख्येला पुरेल इतका धान्यसाठा या आधार पडताळणीमधून मिळत आहे. ई-पॉस या मशीनवर अंगठा घेऊन ही पडताळणी केली जाते. दोन महिन्यात जिल्ह्याने सुमारे साडेपाच लाख कार्डांची नोंदणी केली. दर महिन्याच्या १ तारखेला रेशन दुकानात या लाभार्थ्यांना मिळणारा धान्यसाठा आगाऊ उपलब्ध होतो. अन्न पुरवठ्याविषयीची ही माहिती एका क्‍लिकवर रेशन दुकानदारापासून ते जिल्हा पुरवठा अधिकारी ते अन्न नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवापर्यंत विश्‍लेषणासह उपलब्ध होणार आहे.

दोन महिन्यांत मोहीम यशस्वी
कोल्हापूर जिल्ह्यात हे काम ५ फेब्रुवारी २०१८ ला सुरू झाले. अवघ्या दोनच महिन्यात ही मोहीम यशस्वी झाली. जिल्ह्यातील आजरा तालुक्‍याने तर उच्चांकी अशी ९४ टक्के 
कार्डांची नोंदणी या आधार पडताळणीअंतर्गत केली.

दृष्टिक्षेपात जिल्हा

  •  रेशन कार्डधारकांची संख्या ९ लाख ५० हजार
  •  ऑनलाईन रेशन कार्डधारकांची 
  • संख्या : ५ लाख  ५० हजार
  •  रेशन दुकानदार १४००.
  •  शहरातील दुकानदार १६६

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी अन्नसुरक्षा कायदा केला. शहरी भागातील ५४ हजार उत्पन्नापेक्षा कमी आणि ग्रामीण भागातील ४४ हजारापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या रेशन कार्डधारकांचा समावेश या योजनेत केला. जिल्ह्यातील अशी सुमारे साडेपाच लाख कार्डधारकांची नोंद केली. अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, भंडारा, हिंगोली, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, पुणे, सांगली, सोलापूर, वारणा, वाशिम आदी जिल्ह्यांत आधार पडताळणी मोहीम सुरू केली.

आठ तालुके यादीत
राज्यात ८० टक्केहून अधिक AePDS Transactions झालेल्या तालुक्‍यांच्या यादीत पहिल्या १४ तालुक्‍यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातीलच आठ तालुक्‍यांचा समावेश आहे. यामध्ये आजरा, राधानगरी, कागल, भुदरगड, पन्हाळा, इचलकरंजी, गगनबावडा, शिरोळ या तालुक्‍यांचा समावेश आहे.

रेशन दुकानदारांचे सहकार्य, लोकप्रतिनिधींचा पाठिंबा, पुरवठा, तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे कमी कालावधीत ही नोंदणी करणे शक्‍य झाले. दोन महिन्यांच्या आत साडेपाच लाख कार्डावर अवलंबून असणाऱ्या २५ लाख लोकांना या सिस्टीमद्वारे धान्य मिळते. कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न राहतील. काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे.
- विवेक आगवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी

कोल्हापूर जिल्हा चळवळीचा जिल्हा असल्याने कमी वेळेत हा नवा बदल करणे शक्‍य झाले. काळा बाजाराला हद्दपार करण्यासाठीच चळवळीने प्रयत्न केले. त्याचेच फळ या चांगल्या योजनेतून मिळते. ई-पॉस या मशीनद्वारे आधार पडताळणी करून योग्य लाभाथींलाच धान्याचे वाटप केले जाते ही चांगली बाब आहे. यातील त्रुटी दूर करण्याचा पाठपुरावा सुरू राहील.
- चंद्रकांत यादव,
रेशन आंदोलक

Web Title: Kolhapur News Adhar verification district first