मतदार नोंदणी केली तरच मिळणार प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

विद्यापीठाची १ ते ३१ जुलै दरम्यान मोहीम - सर्व महाविद्यालयांत प्रक्रिया
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयात कोणत्याही वरिष्ठ शाखेतील प्रथम वर्षास प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना प्रवेशासोबत मतदार नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अठरा ते एकवीस वर्षांतील प्रथम मतदारांची नोंदणी करण्यासाठी ही विशेष मोहीम होत असून, मतदार नोंदणीचा अर्ज न भरणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश मिळणार नाही.

नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयावरच मतदान ओळखपत्र दिले जाणार आहे. लोकशाही प्रक्रियेत तरूणांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, या उद्देशाने १ ते ३१ जुलै २०१७ दरम्यान ही मोहीम होणार आहे. 

शालेय शिक्षण विभागाने मतदार नोंदणीबाबतचा आदेश दिला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासोबत नमुना क्रमांक सहाचा अर्ज देणे आवश्‍यक आहे. त्यासमवेत अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांकडून सर्व जिल्हाधिकारी व कुलगुरू यांच्याशी व्ही. सी. द्वारे संवाद साधत त्याची माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याशी मतदार नोंदणीविषयी सविस्तर चर्चा झाली असून, मतदार नोंदणीसाठी कॅंम्पस ॲम्बेसेडर व नोडल ऑफिसर, तर महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला स्टुडंट ॲम्बेसेडर म्हणून नेमण्यात येत आहे. मतदार नोंदणीचे अर्ज तहसीलदारांतर्फे महाविद्यालयाला पुरविण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील महाविद्यालयांना मतदार नोंदणी अर्ज पाठविण्यात आले आहेत. डॉ. भगवान माने यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. 

ओळखपत्र देण्याची व्यवस्था
डॉ. माने म्हणाले, ‘‘लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, असाही या मोहिमेचा उद्देश आहे. त्यासाठी मतदार नोंदणी अर्ज भरून घेण्यात येत आहेत. अर्ज भरून घेतल्यानंतर ते तहसीलदार कार्यालयाकडे पाठविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे केली जाईल. महाविद्यालयावर ही ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.’’

Web Title: kolhapur news admission depend on voter registration