अकरावी प्रवेश प्रकिया बंद पाडण्याचा एआयएसएफचा प्रयत्न

संदीप खांडेकर
सोमवार, 25 जून 2018

कोल्हापूर - यंदा अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पत्र दहा रूपयांनी वाढविल्याने ऑल इंडिया स्टुडंट्‌स फेडरेशनतर्फे कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. फेडरेशनचे गिरीश फोंडे व केंद्रप्रमुख रवींद्र पोर्लेकर यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याने अर्धा तास प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली.

कोल्हापूर - यंदा अकरावी प्रवेशासाठी प्रवेश पत्र दहा रूपयांनी वाढविल्याने ऑल इंडिया स्टुडंट्‌स फेडरेशनतर्फे कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. फेडरेशनचे गिरीश फोंडे व केंद्रप्रमुख रवींद्र पोर्लेकर यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याने अर्धा तास प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली. वाढीव शुल्क का देता, असा प्रश्‍न उपस्थित करत फोंडे यांनी पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परगावच्या पालकांतून मात्र नाराजीचा सूर उमटला.

अकरावी ते पदवीपर्यंतच्या प्रलंबित प्रश्‍न सोडवावेत, प्रवेश पत्र शुल्क कमी करावे, अशा मागण्या करत फोंडे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत कॉमर्स कॉलेजवर दुपारी बारा वाजता दाखल झाले. त्यांनी प्रवेश प्रक्रिया बंद पाडण्याचा प्रयत्न केला. केंद्रप्रमुख रवींद्र पोर्लेकर व फोंडे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. प्रवेश प्रक्रिया ठप्प झाल्याने काही पालक नाराज झाले. फोंडे यांनी वाढीव शुल्काचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर बसत असल्याचे सांगण्यात आले. काही पालकांना ही बाब पटली. विद्यार्थी मात्र प्रवेश पत्र कधी मिळणार, या विचारात हॉलमध्येच थांबून होते. कार्यकर्ते हॉलमधून गेल्यानंतर प्रवेश पत्रांची विक्री सुरू झाली. 

फेडरेशनच्या कामाबाबत मला आदर आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे हॉलमध्ये यायला नको होते. प्रवेश प्रक्रिया बंद पाडणार असल्याची कल्पना त्यांनी द्यायला हवी होती. 
- रवींद्र पोर्लेकर,
 केंद्रप्रमुख 

आंदोलने होतात. पण, त्यावर ठोस निर्णय होत नाही. कार्यकर्ते शिक्षणमंत्र्यांचा फोन आला आहे, म्हणून सांगत आहेत. पण, त्यांची अपॉइंटमेंट त्यांना मिळाली आहे काय? 
- रघुवीर देसाई
(पालक, कोल्हापूर) 

वाढीव शुल्काला विरोध झाला पाहिजे. पालकांनी अशा आंदोलनांना सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी. अन्यथा भविष्यात शिक्षण इतके महाग होईल, की मुलांना शिक्षण देणेच परवडणार नाही. 
- शंकर वादाणे
(कोल्हापूर) 

प्रवेश पत्राचे शुल्क वाढले असेल, तर प्रवेश प्रक्रिया बंद पाडणे त्यावरील उपाय नव्हे. शुल्क कमी करण्याविषयीचे आंदोलन आधीच व्हायला हवे होते. आता जाग येऊन काय उपयोग? 
- मिलिंद हितारे
(पालक, कोल्हापूर) 

Web Title: Kolhapur News AISF agitation in commerce college