शिवसेनेचे राजकारण दुटप्पी - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली असून शिवसेनेचे दुटप्पी राजकारण जनतेच्या लक्षात आले आहे. राज्यात सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील हल्लाबोल सभेत केले.

जयसिंगपूर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विरोध करणाऱ्यांनाही आता त्यांचे विचार पटू लागले आहेत. तेच शेतकऱ्यांचे तारणहार आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला साथ द्यावी. भाजपला सत्तेवरून बाजूला करा. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली असून शिवसेनेचे दुटप्पी राजकारण जनतेच्या लक्षात आले आहे. राज्यात सलोखा राखण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील हल्लाबोल सभेत केले.

विक्रमसिंह मैदानावर झालेल्या सभेत त्यांनी श्री. पवार यांनी भाजपच्या कारभाराचा पाढा वाचला. ते म्हणाले, ‘‘गेल्या पन्नास वर्षांत राज्याला अनेकांनी दिशा देण्याचे काम केले. भाजपमुळे राज्याचा कारभार दिशाहीन झाला आहे. भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. हे सरकार फसवे आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे. भाजप नेत्यांना एक न्याय व इतरांना वेगळा न्याय दिला जात आहे. डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे.

साखर उद्योगाची अवस्था खूपच बिकट झाली आहे. परदेशात २१०० आणि २२०० रुपये साखरेचे प्रतिक्विंटल दर असताना निर्यात तरी कशी परवडणार? सहकारमंत्री म्हणतात की, साखर खरेदी करू; मात्र त्याला अद्याप मुहूर्त मिळत नाही. विचारले तर म्हणतात अभ्यास सुरू आहे. मागेल त्याला आम्ही वीज दिली. आज वीज जोडच दिले जात नाहीत. भाजप सरकारने हजारो कोटी रुपयांचे कर्ज जनतेच्या माथी मारले आहे.

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सांगलीच्या अनिकेत कोथळेचा काय गुन्हा, अश्‍विनी बिंद्रेंसारख्या महिला अधिकाऱ्याची हत्या केली जाते. डीवायएसपी महिलेला अपमानास्पद वागणूक दिली जाते. सर्वच पातळ्यांवर अनागोंदी आहे.’’
 

Web Title: Kolhapur News Ajit Pawar Comment