जेव्हा आजोबाच आपले नाव विसरतात

सुधाकर काशीद
बुधवार, 10 जानेवारी 2018

वाढत्या वयात पूर्ण स्मृती, अर्धवट स्मृती, काही क्षणांसाठी स्मृती जाणे या ‘अल्झायमर’ आजाराने ग्रासलेले दिसून येतात. हा आजार वयोवृद्धांत कमी-अधिक प्रमाणात आढळतो. पण, वयोवृद्धांबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनाही सैरभैर करून टाकणारा आहे.

कोल्हापूर - ऐंशी ते पंच्याऐंशी वयाचे हे आजोबा एकटेच स्टेशन रोडवरून जात होते. चालण्यात वेग नव्हता. एक-एक पाऊल टाकत होते. भिरभिरत्या नजरेने इकडे-तिकडे पाहत होते. समोरून येणारे वाहनचालक जोरजोरात ‘हॉर्न’ वाजवत होते. पण, आजोबा आपल्याच विश्‍वात होते. दोन-तीन तरुणांनी त्यांना पाहिले. हाताला धरून रस्त्याच्या मधून बाजूला घेतले. आजोबांना त्यांच्या घरी सोडायच्या हेतूने त्यांना नाव व पत्ता विचारू लागले. हे आजोबा वरवर तरी चांगल्या घरातले; पण ते आपले नाव-पत्ताच विसरून गेल्याचे ध्यानात आले.

हे आजोबा केवळ एक उदाहरण. पण, वाढत्या वयात पूर्ण स्मृती, अर्धवट स्मृती, काही क्षणांसाठी स्मृती जाणे या ‘अल्झायमर’ आजाराने ग्रासलेले दिसून येतात. हा आजार वयोवृद्धांत कमी-अधिक प्रमाणात आढळतो. पण, वयोवृद्धांबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनाही सैरभैर करून टाकणारा आहे. काल (ता. ८) स्टेशन रोडवर आपला पत्ता विसरल्याने सैरभैर होऊन फिरणाऱ्या आजोबांकडे काही तरुणांचे लक्ष गेले म्हणून ठीक झाले, नाही तर त्यांना त्यांचे घर पुन्हा आठवणे किंवा त्यांचा शोध घेणे हे कुटुंबीयांना खूप त्रासदायक ठरले असते.

स्टेशन रोडवर फिरणारे आजोबा वरवर गोंधळलेले दिसत होते. पण, त्यांना विश्‍वजित काटकर, अमोल कांबळे, निखिल कोळी, अमृत पाटील, त्रिवेणी कुमार या तरुणांनी आधार दिला. त्यांना बोलता येत होते. पण, नाव-पत्ता विचारला की ते आठवत नाही, असे उत्तर देत होते. त्यांना त्यांचे नाव, कुटुंबातील कोणाचे तरी नाव, पत्ता किंवा इतर पूरक माहिती आठवावी व त्यावरून त्यांच्या कुटुंबाचा माग काढता यावा, यासाठी खूप प्रयत्न करण्यात आले. पण, आजोबांच्या गळ्यापर्यंत काहीतरी शब्द येत होते; पण त्यांना ते सांगता येत नव्हते.

या परिस्थितीत आजोबांना रस्त्यावरच सोडणे या तरुणांच्या मनाला पटले नाही. त्यांनी आजोबांना रात्रभर एका शासकीय वसतिगृहात ठेवले. पुन्हा सकाळी त्यांच्याकडे वेगवेगळ्या मार्गाने चौकशी सुरू ठेवल्यावर कोणत्या तरी शब्दाने ते भानावर आल्यासारखे झाले व त्यांनी पटकन आपले नाव एकनाथ घाटगे व आपण मुलीच्या घरात राहायला आल्याचे आणि अचानक नाव व पत्ताच विसरलो असल्याचे सांगितले. मुलीचे नाव व पत्ता कळताच या तरुणांनी त्यांच्याशी संपर्क साधला. रात्रभर आपले बाबा नसल्याने कन्याही चिंताग्रस्त झाली होती. समोर वडील दिसताच त्यांना आनंद झाला. हे आजोबा म्हणजे ‘अल्झायमर’ या आजाराचे एक उदाहरण. या आजारात विस्मरण होते. काही जणांची स्मृती कायम जाते. काहींची अर्धवट स्मृती जाते. वाढत्या वयानुसार हा आजार बळावतो. गरीब-श्रीमंत हा भेद न ठेवता हा आजार कोणालाही होतो. आजारामुळे त्या व्यक्तीबरोबरच कुटुंबीयांनाही त्रास होतो.

अल्झायमर हा आजार वयाच्या सत्तरीनंतर जाणवू लागतो. या आजारात व्यक्तीला गोष्टी आठवतात; पण अचानक समोरच्याचे नाव, वस्तूचे नावच आठवत नाही. नंतर-नंतर त्याला आपला पत्ता आठवत नाही. तो बाहेर पडतो; पण काही वेळानंतर कोणत्या कामासाठी बाहेर पडलो, हेच आठवत नाही. पैशांचा हिशेब जमत नाही. वाढत्या वयानुसार हा आजार बळावतो. औषधे आहेत; पण त्याहीपेक्षा अशा व्यक्तींची लक्षणे ओळखून त्यांच्या कुटुंबीयांनीच त्यांना सांभाळणे महत्त्वाचे आहे. हा आजार जगभरात आहे. त्यामुळे हा आजार दिसण्याचे प्रमाण किंवा या आजाराशी संबंधित व्यक्ती वाढल्या आहेत.
- डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर,
ज्येष्ठ मेंदूविकारतज्ज्ञ

Web Title: Kolhapur News Alzheimer human interest story

टॅग्स