पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीस पुजारी नियुक्त करण्याचा अधिकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरासाठी केलेला स्वतंत्र कायदा जोपर्यंत अमलात येत नाही, तोपर्यंत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे मंदिराबाबतचे अधिकार कायम आहेत. आम्हाला पुजारी नियुक्त करण्याचा अधिकार असून त्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे नियोजित वेळेनुसार अर्जदारांच्या मुलाखती होणार आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच मुलाखतीतून निवडले जाणारे पुजारी हे कायम नसून ते तात्पुरते असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

देवस्थान समितीला पुजारी नियुक्तीचा अधिकार नाही, असे श्री करवीर निवासिनी पुजारी हटाव संघर्ष कृती समितीने पत्रकाद्वारे जाहीर केले होते. याबाबत खुलासा जाधव यांनी केला. या वेळी जाधव म्हणाले, मुंबईत विधी व न्याय विभागाची बैठक झाली. यात विधी व न्याय विभागाच्या सचिवांनी हंगामी पुजारी नेमण्यासाठी मुलाखत घ्या, असे तोंडी सांगितले असून त्यानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. याबाबतची कोणतीही जाहिरात देऊ नये, असे सांगण्यात आल्याने आमच्याकडे जे अर्ज आले, त्यांची मुलाखत प्रक्रिया १९, २० आणि २१ या तीन दिवशी राबवली जाईल. मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ गोपनीय आहे. संस्कृत भाषेचे तज्ज्ञ शिवदास जाधव व गणेश विश्‍वनाथ नेर्लेकर, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार हे मुलाखती घेणार आहेत. यांच्याशिवाय शंकराचार्य मठातील तज्ज्ञ व्यक्ती असणार आहे. निवडल्या जाणाऱ्या पुजाऱ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल.

पत्रकार परिषदेला पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, सदस्य बी. एन. पाटील-मुंगळीकर, सचिव विजय पोवार उपस्थित होते. 

निवडण्यात येणारे पुजारी हे तात्पुरते आहेत. कायमस्वरूपी पगारी पुजारी नेमताना स्वतंत्र निवड प्रक्रिया राबवली जाईल. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पारंपरिक पुजाऱ्यांचे हक्क संपुष्टात येतील. कायमस्वरूपी पगारी पुजारी नेमण्यासाठी जो कालावधी असेल, त्यात धार्मिक विधी चुकू नयेत यासाठी हे हंगामी पुजारी नेमले जाणार आहेत.
- महेश जाधव,
अध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

Web Title: Kolhapur News Ambabai Temple Pujari selection issue