समुद्रात बुडालेला अमोल घरी येतो तेव्हा...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

अभियंता झालेला मुलगा अमोल (वय २५) याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचे समजून घरी हुंदक्‍यांनी घर भरून गेले होते आणि अचानक अमोल दारात उभा होता. त्याला पाहून पाटील कुटुंबीयांना सुखद धक्का बसला.

आळते - हाताशी आलेला मुलगा डोळ्यांदेखत नाहीसा झाला.. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला... नातेवाईक, शेजाऱ्या-पाजाऱ्यांची सांत्वनासाठी रीघ लागली... ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना’ असे म्हणत कुटुंबीय स्वत:ची समजूत घालू लागले... आणि सोमवारी (ता.30 एप्रिल) दुपारी चमत्कार झाला. जो मुलगा समुद्रात बेपत्ता झाला होता, तोच मुलगा दत्त म्हणून दारात उभा राहिला! घर पुन्हा एकदा आनंदानं भरून गेलं.

नरंदे (ता. हातकणंगले) येथील दिलीप पाटील यांच्या कुटुंबीयांबाबत ही घटना घडली. याबाबतची अधिक माहिती अशी त्यांचा अभियंता झालेला मुलगा अमोल (वय २५) याचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याचे समजून घरी हुंदक्‍यांनी घर भरून गेले होते आणि अचानक अमोल दारात उभा होता. त्याला पाहून पाटील कुटुंबीयांना सुखद धक्का बसला. अमोलला त्याक्षणी अनेकांनी कवेत घेतले. दुःखाश्रूंचे रूपांतर क्षणात आनंदाश्रूत झाले. 

अनेक प्रश्‍न अनुत्तरितच...
आठ दिवसांपासून बेपत्ता झालेला अमोल अचानकपणे कसा दाखल झाला? घडलेली घटना खरी की खोटी? तो समुद्रात बेपता होता. त्याची रितसर नोंदही होती; मग तो सापडल्यानंतर तिथे संबंधितांनी का कळविले नाही? अशा एक ना अनेक प्रश्‍नांची उत्तरे आज तरी गुलदस्त्यात आहेत. अमोलच त्यावर प्रकाश टाकू शकतो.

दुपारी एका रिक्षातून अमोल घरासमोर आला. वेगाने येऊन थांबलेली रिक्षा तितक्‍याच गतीने परत गेली. अमोल दारात असल्याचे पाहून सुखद धक्का बसलेले सावरेपर्यंत रिक्षाचालक गावातून बाहेर पडला. त्याला शोधण्यासाठी काही वेळाने पाठोपाठ गेलेले ग्रामस्थ रिकाम्या हाताने मागे फिरले.

या साऱ्या घटनाक्रमाची सुरुवात नऊ दिवसांपूर्वी झाली होती. अमोल नऊ दिवसांपूर्वी मित्र सतीश ढोके याच्याबरोबर अलिबाग येथील काशीद बंदरावर गेला होता. तेथील स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत तो समुद्रात झेपावला. तो लाटेबरोबर वाहून गेल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाली. कुटुंबातील कर्ते तेथे गेले. तेथील प्रशासनाने बोटी आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध घेतला; पण अमोल सापडला नाही. नातेवाइकांनी त्याची आशा सोडली होती. दरम्यान, अचानक नरंदे येथील त्याच्या घरी एका रिक्षातून तो आला.

दिलीप पाटील विमा कंपनीमध्ये अधिकारी आहेत. अमोलचे शिक्षण नवोदय विद्यालय कागल व फर्ग्युसन कॉलेज (पुणे) येथे झाले आहे. सध्या तो स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करीत आहे. 

Web Title: Kolhapur News Amol Return to home special story