‘अमूल’चा जयसिंगपुरात प्रकल्प

गणेश शिंदे
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

जयसिंगपूर - दूध उत्पादकाला इतरांच्या तुलनेत रुपया अधिक आणि ग्राहकाला तीन रुपये कमी दराने दूध विक्रीचे तंत्र घेऊन आंतरराष्ट्रीय ब्रॅंड असलेल्या ‘अमूल दूध’ने जिल्ह्यात दमदार एंट्री केली आहे. जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहतीमधील ‘दत्त दूध’ अशी ओळख असणाऱ्या घाटगे फूड अँड मिल्क प्रॉडक्‍टस्‌ प्रा.लि.मध्ये दोन दिवसांपासून ‘अमूल’च्या दूध संकलन व पॅकिंग प्रक्रियेला सुरवात झाली.

ॲड. स्वाती अरुण घाटगे अध्यक्ष असणाऱ्या घाटगे फूड अँड मिल्क प्रॉडक्‍टस्‌ प्रा.लि.च्या इमारतीमध्ये अमूलने दूध संकलन आणि पॅकिंग प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.

दुग्ध व्यवसायाला चालना मिळू शकणारा जिल्हा म्हणून राज्यात कोल्हापूरचा लौकिक आहे. जिल्ह्यातही शिरोळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन होते. ऊस पट्ट्यामधील तालुक्‍यातील दुधावर जिल्ह्यातील दूध संघांची उद्दिष्टपूर्ती होते. मोठ्या प्रमाणावरील दूध उत्पादन, व्यवसायाला चालना, पोषक स्थिती लक्षात घेऊन अमूलने जयसिंगपूरमध्ये नव्याने केंद्र सुरू केले आहे. ५० हजार लिटरपेक्षा अधिक संकलनानंतर उत्पादकांना सवलती दिल्या जाणार आहेत. 

पहिल्या टप्प्यात तालुक्‍यातील दूध संकलनाला प्रारंभ झाला आहे. दुधाची गुणवत्ता जपण्यासाठी विशेष प्रयत्न आहेत. ताक, दही, पनीर, श्रीखंड, आम्रखंडच्या उत्पादनाचा प्रयत्न आहे. उत्पादकांना म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर एक रुपये जादा तर ग्राहकांची तीन रुपयांची बचत होणार असल्याने उत्पादक आणि ग्राहक दोघांसाठी अमूलने ‘दुग्धशर्करा’ योग जुळवून आणला आहे.

गुणवत्तापूर्ण आणि सकस दूध म्हणजे अमूल अशी ओळख अमूलने जपली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला नक्कीच चालना मिळणार आहे, हे ओळखून जयसिंगपूरमध्ये केंद्र सुरू केले आहे. उत्पादक आणि ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. अमूलच्या माध्यमातून फ्रेश दूध ग्राहकांना पुरविण्याचा प्रयत्न असेल.
- जगदीश वाकोडे 

(प्रभारी व्यवस्थापक, जयसिंगपूर प्रकल्प)

दुग्ध व्यवसायातून उत्पादकांना चार पैसे जादा मिळावेत यासाठी ‘अमूल’ व्यवस्थापनाला घाटगे फूड अँड मिल्क प्रॉडक्‍टस्‌ची इमारत भाडेतत्त्वावर दिली. उत्पादक आणि ग्राहकांचा फायदा लक्षात घेऊन अमूल व्यवस्थापनाला इमारत दिली आहे.
- ॲड. स्वाती घाटगे 

(अध्यक्ष, घाटगे फूड अॅण्ड मिल्क प्रॉडक्‍टस्‌ प्रा. लि.)

Web Title: Kolhapur News Amul Milk Project in Jaysinghpur