राणेंची शिवसेनेवर बोलायची लायकी आहे का? - दुधवडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

कोल्हापूर - ‘‘नारायण राणे यांचे स्वत:चे अस्तित्व संपले आहे. ते कोल्हापुरातील शिवसेना काय संपवणार? शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका करून महाराष्ट्रात मोठे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राणे यांची शिवसेनेवर बोलायची लायकी तरी आहे का?’’ अशी टीका शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी  येथे केली. 

कोल्हापूर - ‘‘नारायण राणे यांचे स्वत:चे अस्तित्व संपले आहे. ते कोल्हापुरातील शिवसेना काय संपवणार? शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका करून महाराष्ट्रात मोठे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राणे यांची शिवसेनेवर बोलायची लायकी तरी आहे का?’’ अशी टीका शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी  येथे केली. 

स्वाभिमान पक्षाने कोल्हापुरात घेतलेल्या मेळाव्यात नारायण राणे यांनी शिवसेना संपविण्याची भाषा केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘कोकणातून नारायण राणे यांची सत्ता गेली आहे. दोन वेळा पराभव झाला आहे. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकल्यामुळे आपण मोठे होऊ, असे त्यांना वाटते; मात्र शिवसेनेचे उपकार विसरलेल्या राणेंचे स्वत:चे अस्तिव संपले आहे. मुलांच्या राजकीय कारकिर्दीसाठी स्वाभिमानी पक्ष काढला असेल, तर पक्ष रुजविण्याचे काम त्यांनी करावे. शिवसेना किंवा श्री. ठाकरे यांच्याविरुद्ध तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल.’’ 

ते म्हणाले, ‘‘कोकणाच्या राजकारणातून राणे यांची हकालपट्टी झाली आहे. काँग्रेसमधून ते बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता करायचे काय, हा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना घराघरांत पोचली आहे. येथे ती संपवायची भाषा राणे यांच्याकडून केली जाते, हे हास्यास्पद आहे.’’ 

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘राणेंना शिवसेनेने शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री पदापर्यंतची सर्व पदे दिली. याची जाणीव त्यांना नाही. काँग्रेसनेही त्यांना मंत्री केले. याचीही जाण त्यांनी ठेवली नाही. कोकणात पराभूत झालेले आणि ज्यांनी स्वत:चा मतदारसंघ राखला नाही ते राणे कोल्हापुरातील शिवसेना संपविण्याची भाषा करतात. येथेच त्यांचा तोल ढासळल्याचे लक्षात येते. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागणार आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन पक्ष बदलणाऱ्या राणेंना शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशिवाय कोणीही दिसत नाही. त्यामुळेच ते टीका करत आहेत.’’ या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, युवासेना अध्यक्ष हर्षल सुर्वे उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Arun Dudhawadkar comment