गुजरातच्या निकालावरच मध्यावधीची नांदी - अशोक चव्हाण 

गुजरातच्या निकालावरच मध्यावधीची नांदी - अशोक चव्हाण 

कोल्हापूर - गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 2018 च्या मध्यावधी निवडणुकीची नांदी असेल, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

चव्हाण आज एक दिवसाच्या कौल्हापूर दौऱ्यावर होते. ते म्हणाले, ""नोटाबंदी, जीएसटी, मंदीचे वातावरण यामुळे सध्याची परिस्थिती स्फोटक आहे. सर्वच घटकांत असंतोष खदखदत आहे. गुजरातच्या निवडणुकीत पंतप्रधानांना तळ ठोकावा लागतो, यावरून निवडणुकीची भाजपने धास्ती घेतली असल्याचे दिसते. निकाल काय असेल हे ठाऊक नाही; पण ही निवडणूक लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीची नांदी असेल. सद्य:स्थिती पाहता 2019 हे वर्ष उजाडण्याची गरज लागणार नाही. 2018 लाच निवडणुका होतील, असे सध्याचे चित्र आहे. गुरुदासपूरची पोटनिवडणूक असो अथवा नांदेड महापालिका असो अथवा परभणी असो, येथे कॉंग्रेसला घवघवीत यश मिळाले. हे यश पाहवत नसल्यानेच कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. 

 श्री. चव्हाण पुढे म्हणाले, सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी उदासीन आहे. सोयाबीन, कापूस, तुरीची खरेदी केंद्रे कुठे आहेत? कर्जमाफीची योजना फसवी आहे. 34 हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा झाली, पण तीन ते चार हजार कोटीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. राज्यातील रस्ते खड्ड्यांत गेले आहे. त्या खात्याचे मंत्री याच जिल्ह्यातील आहेत. सरकार कारभार ऑनलाईन झाल्याचे सांगते; पण सरकारच ऑफलाईन झाले आहे. त्यामुळे कारभार कसा ऑनलाईन असू शकेल? जाहिरातीच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे उद्योग सुरू आहेत. तीनशे कोटी जाहिरातींऐवजी शेतकऱ्यांसाठी खर्च केले असते तर बरे झाले असते.

बारा डिसेंबरला दोन्ही काँग्रेसचा मोर्चा

येत्या बारा डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते धडक देणार आहेत. गुलाब नबी आझाद आणि शरद पवार मोर्चाचे नेतृत्व करतील. राहुल गांधी यांनाही आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. 

परप्रांतीयांबाबत मनसेची भूमिका चुकीची असल्याचे सांगून ते म्हणाले, भारतीय घटनेने कुणालाही कुठेही राहण्याचा अधिकार दिला आहे. त्यातून मनसेने मुद्द्यावरची लढाई गुद्द्यावर आणली आहे, ते योग्य नाही. मुंबईत कॉंग्रेस कार्यालयाची ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी. भविष्यात अशी घटना घडली तर कॉंग्रेस काही घाबरणार नाही, हेही ध्यानात ठेवावे. 

 

नेत्यांतील वाद तडजोडीने मिटवू 
प्रत्येक पक्षात वाद असतात, तसे कॉंग्रेसमध्येही आहेत. मात्र तडजोडीने वाद मिटविले जाऊ शकतात. शेवटी एकसंध राहणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. कॉंग्रेसच्या अंतर्गत निवडणुका सुरू आहेत. कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदासाठी जे प्रस्ताव येतील त्याचा विचार करून सर्वांशी चर्चा करून अध्यक्षांची निवड केली जाईल. जिल्हा कॉंग्रेसचे पी. एन. पाटील सध्या अध्यक्ष आहेत. आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांच्यात पदासाठी चुरस आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनी सबुरीचा सल्ला दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com