तीन विद्यमान आमदारांना घटनेची माहिती - बिंद्रे कुटुंबीयांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

कोल्हापूर - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे खुनाच्या घटनेची तीन विद्यमान आमदारांना माहिती होती. ते संशयित राजेश पाटील याच्याबरोबर ज्या फ्लॅटमध्ये खून झाला त्या फ्लॅटवर गेले होते, असा सनसनाटी आरोप बिंद्रे यांचे पती राजू गोरे व भाऊ आनंद बिंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे खुनाच्या घटनेची तीन विद्यमान आमदारांना माहिती होती. ते संशयित राजेश पाटील याच्याबरोबर ज्या फ्लॅटमध्ये खून झाला त्या फ्लॅटवर गेले होते, असा सनसनाटी आरोप बिंद्रे यांचे पती राजू गोरे व भाऊ आनंद बिंद्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच या प्रकरणी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी संशयितांना मदत केली असल्याचा आरोप करीत त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्याचीही मागणी या वेळी केली. तपासकामावर राजकीय दबाव येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अश्‍विनी बिंद्रे या बेपत्ता झाल्यापासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. नगराळे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज होती. मात्र त्यांनी आरोपींना मदत केली असल्याचा आरोप बिंद्रेंचे पती राजू गोरे आणि भाऊ आनंद बिंद्रे यांनी केला. 

ज्या दिवशी बिंद्रे यांचा खून झाला, त्यादिवशी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा संशयित राजेश पाटील हा तीन विद्यमान आमदारांबरोबर होता. त्या वेळी त्याला संशयित अभय कुरुंदकरने २० ते २२ फोन केले. त्यानुसार राजेश पाटील तीन आमदारांबरोबर खून झालेल्या फ्लॅटवर गेला होता. गोष्ट तपास अधिकाऱ्यांच्या टिप्पणीत आल्याचा आरोप गोरे व बिंद्रे यांनी केला. मात्र, प्रत्यक्ष ही गोष्ट पोलिस रेकॉर्डवर आलेली नाही. याबाबत तपास यंत्रणेने संबंधित आमदारांचा ‘सीडीआर’ काढून खात्री करून घ्यावी. त्यात तथ्य असेल तर त्यांची नावे जाहीर करावीत आणि हे प्रकरण माहीत असूनही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी हे प्रकरण पोलिसांसमोर का आणले नाही, याचाही तपास करावा, अशी मागणी केली. 

दीड महिन्यापासून प्रकरणाचा सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्या नेतृत्वाखाली तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र, त्यांच्याकडे केवळ तीनच महिने हा तपास सोपविला आहे. त्यातील दीड महिन्याचा कालावधी या अगोदरच पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करून या तपास पथकात फेरनेमणूक करावी. कारण सदरचा गुन्हा हा तांत्रिक बाबींच्या पुराव्यावर उभा आहे. त्याबाबतचे सर्व बारकावे त्यांनाच माहिती आहेत.

तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांचीही तपास पूर्ण होईपर्यंत बदली करू नये. संशयित कुरुंदकर पोलिस अधिकारी, तर राजेश पाटील हा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे. ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात. त्यामुळे हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. त्यावर सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी गोरे व बिंद्रे यांनी केली. 

या तपास कामात दिरंगाई झाली आहे. त्याला जबाबदार प्रत्येक घटकाच्या चौकशीसाठी न्यायाधिशांसह आयपीएस महिला पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमावी. संशयित अभय कुरुंदकर याला पोलिस खात्यातून बडतर्फ करावे, तसेच त्याला देण्यात आलेली पोलिस महासंचालक पदक व राष्ट्रपती पदके शासनाने काढून घ्यावीत, अशी मागणी केली. 

पोलिस निरीक्षक संजय कुरुंदकर हे संशयिताला भाऊ म्हणून भेटण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ते तपासात वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्या दबावामुळे तपासकामात अडथळे येऊ शकतात. त्यांची बदली करावी, अशी मागणी गोरे यांनी केली. 

दोषींना सोडू नका...
माझ्या मुलीला मारून काय मिळाले, एका महिलेला मारण्यात काही पुरुषार्थ आहे का? अशी विचारणा करीत तपास यंत्रणेने दोषींना पकडून मोठी शिक्षा होईल, असे पुरावे गोळा करावेत, अशी मागणी अश्‍विनी बिंद्रेचे वडील जयकुमार बिंद्रे करीत असताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.

Web Title: Kolhapur News Ashwini Bidre Murder case