सहायक फौजदार जाधवसह कॉन्‍स्‍टेबल काळे निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

कोल्हापूर - दाभोळकर कॉर्नर येथे तरुणास झालेल्या मारहाणप्रकरणी सहायक फौजदार संदीप विठ्ठलराव जाधवसह पोलिस नाईक प्रवीण काळे या दोघांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी काढले.

कोल्हापूर - दाभोळकर कॉर्नर येथे तरुणास झालेल्या मारहाणप्रकरणी सहायक फौजदार संदीप विठ्ठलराव जाधवसह पोलिस नाईक प्रवीण काळे या दोघांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी काढले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या दोघांनी मारहाण केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे त्यात स्पष्ट म्हटले आहे. 

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही पोलिसांचा सहभाग आहे का, हेही तपासले जात आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केली जाईल, असे श्री. मोहिते यांनी स्पष्ट केले आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाधव, तर काळे आजरा पोलिस ठाण्यात नियुक्त होते.

दाभोळकर कॉर्नर येथे रविवारी (ता. सहा) रात्री उशिरा पोलिसांनी मार्शल गर्दे (वय २७) याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. जखमी गर्दे याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित जाधवसह अन्य पाचजणांवर गुन्हा दाखल आहे. जाधव यांच्या फिर्यादीनुसार गर्देसह त्याच्या २० ते २५ साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. 

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, श्री. मोहिते यांनी शाहूपुरीचे निरीक्षक संजय मोरे व शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना तपासाचे आदेश दिले होते. त्यांनी घटनास्थळी सीसीटीव्ही आणि जवाबांआधारे प्राथमिक अहवाल श्री. मोहिते यांच्याकडे दिला. श्री. मोहिते यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. 

मद्यप्राशन नाही
या प्रकारात मारहाणीचा आरोप असणाऱ्या पोलिसांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप झाला. त्यावरून सहायक फौजदार संदीप जाधव यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी मद्य प्राशन केले नसल्याचा अहवाल डॉक्‍टरांकडून मिळाल्याचे शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी सांगितले. 

काळेंवर यापूर्वीही कारवाई 
गगनबावडा येथे काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात गोंधळ घातल्याप्रकरणी काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांत प्रवीण काळेंचाही समावेश होता, असे मोहिते यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News assistant PI Jadhav, constable Kale Suspended