कोल्हापूरच्या फुटबॉलचा राज्यात दबदबा - अप्पासाहेब वणिरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

कोल्हापूर - ‘फुटबॉलवर जिवापाड प्रेम करणं, ही कोल्हापूरकरांची खासियत असल्यानेच राज्यात कोल्हापुरी फुटबॉलचा दबदबा आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ खेळाडू अप्पासाहेब वणिरे यांनी येथे केले.

नेताजी तरुण मंडळ व कोल्हापूर  स्पोर्टस्‌ डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हतर्फे अटल चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेनिमित आयोजित ज्येष्ठ खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ४९ ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. उभा मारुती चौकात कार्यक्रम झाला.

कोल्हापूर - ‘फुटबॉलवर जिवापाड प्रेम करणं, ही कोल्हापूरकरांची खासियत असल्यानेच राज्यात कोल्हापुरी फुटबॉलचा दबदबा आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ खेळाडू अप्पासाहेब वणिरे यांनी येथे केले.

नेताजी तरुण मंडळ व कोल्हापूर  स्पोर्टस्‌ डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हतर्फे अटल चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेनिमित आयोजित ज्येष्ठ खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ४९ ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. उभा मारुती चौकात कार्यक्रम झाला.

दरम्यान शाहीर दिलीप सावंत यांच्या फुटबॉल वरील पोवाड्याने कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्री. वणिरे म्हणाले, ‘‘प्रतिकूल परिस्थितीतून कोल्हापूरचा फुटबॉल विकसित झाला आहे. एका लिंबाच्या आठ फोडी करून खेळाडूंनी खाल्ल्या आहेत. पिढ्यान्‌ पिढ्या फुटबॉलचा वारसा जपला आहे. त्यामुळेच आज फुटबॉलला सोन्याचे दिवस आलेत.’’

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘‘बक्षिसांच्या खैरातीतून कोल्हापूरचा फुटबॉल महाराष्ट्रात चर्चेचा ठरला पाहिजे, यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्थानिक खेळाडूंनाच ही बक्षिसे मिळावीत असा स्पर्धेचा उद्देश आहे.’’ 

शिवाजी तरुण मंडळाचे सुजित चव्हाण म्हणाले, ‘‘ही स्पर्धा फुटबॉल क्षेत्राला बळ देणारी आहे. मंत्री झाल्यानंतर खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे देण्याची दानत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ठेवली आहे.’’

या प्रसंगी शिवाजी तरुण मंडळाचे गजानन इंगवले, अप्पासाहेब वणिरे, चंद्रकांत साळोखे, भाऊ सुतार, आनंदा इंगवले, मधुकर तावडे, सुरेश जरग, सुरेश वणिरे, बाळासाहेब शिकलगार, प्रल्हाद पवार, अण्णा नालंग, चंद्रकांत बुवा, प्रकाश राऊत, लाला गायकवाड, प्रल्हाद चव्हाण, नामदेव सूर्यवंशी, पांडबा पोवार, यशवंत साळोखे, सुरेश साळोखे, गजानन साळोखे, पंडित पोवार, हंबीर चव्हाण, विजय पोवार, बाबूराव पाटील, कोल्हापूर महानगरपालिका फुटबॉल संघातील बाजीराव मंडलिक, संपत मंडलिक, दिलीप माने, प्रभाकर सुतार, प्रकाश पाटील, श्रीकांत लाड, मेहबूब शिकलगार, शौकत महालकरी, किशोर साठे, मेनन अँड मेनन फुटबॉल संघातील सुरेश पाटील, शरद मंडलिक, चंचल देशपांडे, दीपक शिंदे, श्‍याम पौंडकर, संध्यामठ तरुण मंडळातील किसन कुंभार, महाकाली तालीम संघातील प्रभाकर सुतार, बाबूराव साठे, गणेश साठे, विद्यार्थी कामगार फुटबॉल संघातील उदय शेंडे, शीलवंत चव्हाण, दयानंद वणिरे, रंकाळा तालीम फुटबॉल संघातील अली शेख, मर्दानी खेळाच्या आखाड्यातील राजाराम पाटील, रावसाहेब तिबिले यांचा सत्कार झाला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नेताजीचे अध्यक्ष राजू साळोखे, अजित राऊत, सदाभाऊ शिर्के, सुजय पित्रे, राजेंद्र राऊत, प्रदीप साळोखे उपस्थित होते. अशोक देसाई यांनी सूत्रसंचालन केले. 

लोकाश्रयामुळेच फुटबॉल टिकून - मनोज साळुंखे 

‘सकाळ’चे संपादक मनोज साळुंखे शिवाजी तरुण मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू. त्यांची आजही फुटबॉलशी नाळ जोडलेली आहे. त्यांचाही सत्कार झाला. ते म्हणाले, ‘‘कोल्हापूरच्या फुटबॉलला फार मोठी परंपरा आहे. केवळ प्रचंड लोकाश्रयामुळे इथला फुटबॉल टिकून आहे. त्या वेळी चार-आठ आण्यांची लिंबाची अर्धी फोड खाऊन सामने खेळणारा कोल्हापूरचा फुटबॉल पंधरा लाखांच्या बक्षिसांची स्पर्धा आयोजित करत आहे. हा मोठा आणि चांगला बदल आहे. पण, केवळ वादावादी आणि भांडणावर लक्ष केंद्रित न करता, खेळाडूंकडून अधिक तंत्रशुद्ध खेळाची अपेक्षा आहे. जागतिक फुटबॉल वेगवान खेळामुळे वेगळ्या उंचीवर पोचला आहे. सुदैवाने सध्याच्या पिढीला सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्ट फोन हा या पिढीचा गुरू आहे. त्याचा योग्य वापर करून आपल्या फुटबॉलचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याची गरज आहे.’’

Web Title: Kolhapur News Atal Award Football competition