अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेशावरून पाटणकर-श्रीपूजक वाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

कोल्हापूर - सोवळे न नेसल्याच्या कारणावरून श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर व त्यांच्या पत्नी गेल ऑम्वेट यांना आज अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीपूजकांनी प्रवेश नाकारला. या वेळी दलाचे कार्यकर्ते आणि श्रीपूजकांमध्ये जोरदार वाद झाला. त्यामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कोल्हापूर - सोवळे न नेसल्याच्या कारणावरून श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर व त्यांच्या पत्नी गेल ऑम्वेट यांना आज अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीपूजकांनी प्रवेश नाकारला. या वेळी दलाचे कार्यकर्ते आणि श्रीपूजकांमध्ये जोरदार वाद झाला. त्यामुळे तेथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

डॉ. पाटणकर दुपारी बाराच्या सुमारास अंबाबाईच्या दर्शनासाठी सपत्नीक मंदिरात आले. त्या वेळी त्यांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याची तयारी केली. त्यांच्यासोबत मुक्ती दलाचे संपत देसाई, अनिल म्हमाणे, डी. के. बोडके, पी. एल. पाटील. पांडुरंग पोवार, संतोष, मनीषा देसाई सोबत होते. पाटणकर व त्यांचे 
कार्यकर्ते गाभारा प्रवेशावर ठाम राहिले; मात्र श्रीपूजकांनी त्याला विरोध केला. प्रवेश हवा असेल तर सोवळे नेसायला हवे, अशी भूमिका त्यांनी घेतली. पंढरीचा विठोबा, खंडोबासह अंबाबाई ही बहुजनांची देवता असून तिच्या पायी डोके ठेवण्याचा सर्वांचाच अधिकार असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.

श्रीपूजक सोवळे नेसल्याशिवाय प्रवेश न देण्यावर ठाम होते, तर पाटणकर व त्यांचे कार्यकर्ते गाभाऱ्यात जाऊन दर्शनासाठी आग्रही होते. दोन्ही बाजूंनी शाब्दिक चकमक उडाल्यामुळे मंदिर परिसरात तणाव निर्माण झाला. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या अन्य भाविकांना नेमका काय प्रकार झाला हे ध्यानात येईना.

या वेळी देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, पदाधिकारी व पोलिसांनी पाटणकर यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर ते मंदिराबाहेर आले. डॉ. पाटणकर यांनी संतप्त भावना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘सोवळे नेसून गाभारा प्रवेशाचा काही संबंध नाही. ‘विठोबा’ आणि ‘खंडोबा’च्या मंदिरात सोवळे न नेसता दर्शन घेतो. अंबाबाई ही बहुजनांची देवता आहे. त्यामुळे तिच्या पायावर डोके ठेवून दर्शनाचा सर्वांना अधिकार आहे. पंढरपूरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासाठी कायदा व्हायला हवा. पुजारी हटलेच पाहिजेत. सोवळ्याची प्रथा बंद न केल्यास येत्या जानेवारीत कार्यकर्त्यांच्या साक्षीने आंदोलन उभे करू.’’

Web Title: Kolhapur News Bharat Patnkar Shripujak issue