भेळ, मिसळ, चहावाले बनले मॅनेजमेंट गुरू

सुधाकर काशीद
बुधवार, 9 मे 2018

कोल्हापुरातल्या ऑल इंडिया स्पेशल म्हणजे राजाभाऊ भेलचे रवींद्र शिंदे, दसरा चौकाजवळच्या शिव मिसळचे संजय कारंडे, साझ चहाचे सर्जुल देसाई या तिघांनी पतंगराव कदम बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसमोर आपले अनुभव मांडले.

कोल्हापूर - भेळ, मिसळ, चाट आणि चहा हे वरवर छोटे आणि साधे दिसणारे व्यवसाय; पण व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने या व्यवसायांतील राबणाऱ्या हातांची चिकाटी भांडवलापेक्षा महत्त्वाची असते. त्यामुळेच चक्क एम. बी. ए.च्या विद्यार्थ्यांसमोर भेळ, मिसळ आणि चहा अशा तीन व्यावसायिकांचे अनुभवाचे बोल मांडले गेले आणि पुस्तकी ज्ञानाबरोबरच वास्तवातल्या ज्ञानाचे महत्त्वही किती मोलाचे असते, याचे धडे भावी व्यवस्थापनतज्ज्ञांनी घेतले. 

कोल्हापुरातल्या ऑल इंडिया स्पेशल म्हणजे राजाभाऊ भेलचे रवींद्र शिंदे, दसरा चौकाजवळच्या शिव मिसळचे संजय कारंडे, साझ चहाचे सर्जुल देसाई या तिघांनी पतंगराव कदम बिझनेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसमोर आपले अनुभव मांडले. कोणताही अवघड शब्द नाही, कोणतेही शास्त्रीय संदर्भ नाहीत; पण तरीही त्यांनी रोजच्या व्यापातील अनुभव मांडले. साध्यासुध्या शब्दांत व्यक्त केलेले विचार चक्क उपस्थित विद्यार्थ्यांच्या टाळ्या मिळवून गेले. 

प्रत्येक जण जो काही व्यवसाय करत असतो, त्याच्यामागे व्याप असतोच. हा व्याप सांभाळत, येणाऱ्या अडचणींना सांभाळत पुढे जाण्याचा प्रत्येकाचा कमीअधिक प्रमाणात प्रयत्न सुरू असतो. व्यवसायाच्या तंत्रात यालाच व्यवस्थापन म्हटले जाते; पण छोट्या-छोट्या व्यावसायिकांना आपण जे रोज करतो, त्याला व्यवस्थापन म्हणतात हेच माहीत नसते. पण त्यांचे काम नेटाने सुरू असते आणि व्यवसायात हेच नेटाने टिकणे खूप महत्त्वाचे असते. याच नेटावर राजाभाऊ भेल, शिव मिसळ, साज चहा कोल्हापुरात टिकून आहे. 

नेमक्‍या अशाच वरवर छोट्या; पण मोठ्या जिद्दीच्या व्यावसायिकांना या इन्स्टिट्यूटमध्ये बोलावले व त्यांनी व्यवस्थापनातले वास्तवच मांडले. 

व्यवसायात जादा नफा मिळवण्यासाठी जराही तडजोड करू नका, असा सल्ला भेळवाले रवींद्र शिंदे यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘माझ्या भेलच्या चवीत एखाद्या दिवशी जरा जरी बदल झाला, तरी गिऱ्हाईक मला उघडपणे हा बदल सांगतात. मी लगेच चूक सुधारतो. गिऱ्हाइकाला जे पाहिजे, ते मी देतो. मला जे पाहिजे, ते मी गिऱ्हाइकांना देत नाही. हेच माझ्या नव्हे, तर सर्वच यशस्वी व्यवसायाचे रहस्य आहे.’’

कोणताही व्यवसाय करताना लाजायचे नाही. घरात बसून तुमचे पोट भरणार नाही आणि कितीही अडचण आली; तरी गोंधळून न जाता संयम सोडायचा नाही, हा सल्ला मी भावी व्यवस्थापनतज्ज्ञांना दिला. 
- रवींद्र शिंदे, राजाभाऊ भेळ

एमबीएच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोठी असते. पण त्यांना व्यावहारिक अनुभवाची जोड देण्यासाठी बोलावले. सचोटी आणि जिद्दच व्यवसायाचा आधार असल्याचे मी सांगितले. 
- संजय कारंडे, शिव मिसळ

Web Title: Kolhapur News Bhel, MIsal, Tea makers Management Guru