बिनखांबी गणेश रिक्षा मंडळाची आदर्श पायवाट

बिनखांबी गणेश रिक्षा मंडळाची आदर्श पायवाट

कोल्हापूर -  रिक्षाचा टायर खराब झालाय, गाडीचे इंजिन काम निघालंय... अशा चिंतांनी ग्रस्त चालकांना लाखमोलाचा आधार देण्याचे काम ‘श्री बिनखांबी गणेश रिक्षा मित्र मंडळ’ करत आहे. दररोज फक्त १० रुपये भरण्याच्या अटीवर मंडळाने रिक्षाचालकांचा आर्थिक विवंचना सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच उपक्रमाबरोबर रिक्षाचालक व्यसनमुक्त रहावेत, यासाठी आध्यात्मिक सतसंगाची जोडही त्यांना देण्यात येत आहे. बचत, काटकसर, व्यसनमुक्त अशा मनाने समाजात वावरण्याची आदर्श पायवाट चालकांना दाखवली आहे. 

रिक्षाचालक एकत्र आले की, त्यांच्यात केवळ रस्सा मंडळाचीच चर्चा, असा अनेकांचा समज; पण बिनखांबी गणेश मंदिराजवळील ‘श्री बिनखांबी गणेश मित्र मंडळ’ने एक नवा आदर्श घालून दिला. साठ एक वर्षांपूर्वी या रिक्षा मंडळाची स्थापना झाली. जुन्या पिढीची सूत्रे नवीन पिढीने हाती घेतली. हातावरचे पोट असणाऱ्या सर्व रिक्षाचालकांच्या दैनंदिन अडचणी, प्रश्‍न हे एकसारखेच. अशा काळात कोणाचा आधार मिळणार नाही, याचीही प्रत्येकाला जाणीव होती. यातून १९९७ ला अध्यक्ष आनंदराव देसाई, उपाध्यक्ष शामराव फाटक, नामदेव मोरे अशा जाणकार मंडळींनी मंडळाची भिशी सुरू केली.

भिशीतून चालकांना काटकसरीची सवय लावली. संकलित निधीतून चालकांना गरजेनुसार कर्ज मिळू लागले. रिक्षावर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण असते. त्यात खराब झालेला रिक्षाचा टायर बदलणे, इंजिनचे काम करून घेणे चालकाला शक्‍य नसते. अशावेळी त्याला दररोज फक्त १० रुपये भरण्याच्या अटीवर मंडळाने टायर आणि इंजिन कामासाठी तीन हजारांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. रिक्षाचे काम वेळेत झाल्याने चालकांना अपघाताचा धोका टाळता येऊ लागला. रिक्षाचे गॅस किट २००६ मध्ये बसविण्यासाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च येत होता. या मंडळाने पुढाकार घेत थेट कंपनीशी करार करून हे गॅसकिट सभासद चालकांना अवघ्या साडेसात हजार रुपायाला उपलब्ध करून दिले. सहकारी चालकाला वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत मंडळ कोणताही गाजावाजा न करता देते. उपक्रम राबविण्यास मंडळाचे सचिव संजय जाधव, यशवंत जाधव, मोहन बागडी, प्रकाश गायकवाड, सखाराम फटकरे, अप्पा ऐवळे, शिवाजी सासने, राजेंद्र सावंत, अरुण सुतार, विनायक पाटील आदी कार्यकर्ते कार्यरत आहेत. 

आध्यात्मिक आणि सामाजिक बांधिलकीही
आध्यात्मिकतेच्या सहवासातून व्यसनमुक्त व निरोगी जीवनाचा कानमंत्र रिक्षाचालकांना देण्याचे काम मंडळाकडून सुरू आहे. मंडळाचे सदस्य ज्ञानदेव बागडी यांना कडवी नदीपात्रात गणेशमूर्ती सापडली. मानोली (आंबा) येथेच त्याची २६ फेब्रुवारी १९८७ ला प्रतिष्ठापना केली. ग्रामपंचायतीच्या मान्यतेने तेथे मंडळाच्या माध्यमातून मंदिर उभारले. दरमहिन्याच्या संकष्टीला येथे मंडळातील रिक्षाचालक जातात. त्यांच्याकडून तेथे प्रसादाचे वाटप केले जाते. गणेश जयंतीला तर सुमारे सहा ते सात हजार भाविकांचा प्रसाद मंडळाकडून केला जातो. यात सर्व रिक्षाचालक सहकुटुंब सहभागी होतात. दोन वर्षांपासून मानोली परिसरातील वाड्यावस्त्यांमधील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मंडळाकडून केले जाते.

अल्पशिक्षित असंघटित रिक्षाचालकांना एकत्र करून त्यांचे आर्थिक प्रश्‍न सोडविण्याबरोबर त्यांना व्यसनमुक्त करण्याचे काम मंडळाकडून केले जाते. त्यांचा अपघाती विमा उतरवून त्यांना संरक्षण देण्याचा संकल्प आहे. 
- आनंदराव देसाई, 
   अध्यक्ष, बिनखांबी गणेश रिक्षा मित्रमंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com