बायोमेट्रिक हजेरीने उडवली झोप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - बायोमेट्रिक हजेरीने महापालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच झोप उडविली आहे. सकाळी सहाच्या ठोक्‍याला हजेरी, नाही तर सव्वासहाला मशिनद्वारे गैरहजेरी मांडली जाते. त्याचा परिणाम थेट पगारकपातीवर होतो. वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची हजेरी सुरू आहे. 

कोल्हापूर - बायोमेट्रिक हजेरीने महापालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच झोप उडविली आहे. सकाळी सहाच्या ठोक्‍याला हजेरी, नाही तर सव्वासहाला मशिनद्वारे गैरहजेरी मांडली जाते. त्याचा परिणाम थेट पगारकपातीवर होतो. वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी अशा प्रकारची हजेरी सुरू आहे. 

कार्यालयीन कामानिमित्ताने एखादा कर्मचारी बाहेर गेला आणि त्याची हजेरी नोंदली न गेल्यास पगारकपातीची टांगती तलवार कायम राहते. संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठांची मान्यता घेतल्यास पगारकपात होत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. विभागीय कार्यालये, दवाखान्यासह अन्य ठिकाणी चाळीस बायोमेट्रिक मशिन लावली गेली आहेत. प्रामुख्याने आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ सकाळी सहा ते दोन अशी आहे. पावणेसहाला मशिनची सुरवात होते. सहापर्यंत हजेरी मांडावी अशी अशी अपेक्षा आहे. उशिरात उशीरा पंधरा मिनिटे अर्थात सव्वासहापर्यंत मशिन हजेरी स्वीकारते. नंतर एक मिनिट जरी उशीर झाला तरी गैरहजेरी पडते. 

पूर्वी पारंपरिक पद्धतीने रजिस्ट्रवर हजेरी मांडली जात होती. त्यामुळे पळवाटेला वाव होता. प्रामाणिक काम करणारे कर्मचारी राबायचे आणि जे मुकादमाच्या मर्जीतील असायचे, त्यांनी उशिरा आले तरी चालायचे... अशी हजेरीची पद्धत होती. आता वेळेत "इन' झाले तर ठीक, अन्यथा गैरहजेरी पडते. महिन्याचा पगार हाती आला, की बायोमेट्रिक हजेरीचे महत्त्व ध्यानात येते. 

महापालिकेच्या कामकाजाची वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी पावणेसहा अशी आहे. वर्ग दोन आणि तीनच्या अधिकाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची नाही. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्ग तीन आणि चारमध्ये आहेत. पूर्वी कामाची वेळ झाली, की आपल्या मर्जीवर कार्यालयात पोचण्याची वेळ ठरायची. बायोमेट्रिक गैरसोय होत आहे, ती आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांची. झाडू आणि सफाई कामगारांच्या कामाची वेळ सकाळी सहा ते दुपारी दोन अशी आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून सहाच्या आत मशिनला बोट लावावेच लागते. पारंपरिक हजेरीच्या नोंदणीवेळी व्यक्तिगत कारणे सांगता येत होती. तशी स्थिती आता नाही. धावतपळत मशिन गाठावेच लागते. 

प्रक्रिया क्‍लिष्ट असल्याची तक्रार 
कार्यालयीन कामानिमित्ताने एखादा कर्मचारी बाहेर गेला असेल आणि त्याला उशीर झाला तर संबंधित खातेप्रमुखाच्या दाखल्यावर हजेरी मांडली जाते; मात्र प्रक्रिया क्‍लिष्ट असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. असा दाखला घेऊनही हजेरी मांडली गेली की नाही, हे पगार झाल्यानंतरच समजत असल्याची त्यांची तक्रार आहे.

Web Title: kolhapur news Biometric municipal employee