वाहतूक पोलिसांशी उद्धट वर्तन होणार कॅमेऱ्यात कैद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

कोल्हापूर - वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली तर आता अंगलट येणार आहे. कारण त्यांच्या शर्टच्या बटणाला कॅमेरा असणार आहे. तुमचे उद्धट वर्तन त्यांच्या कॅमेऱ्यात कैद होईल. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे आजच असे दहा कॅमेरे आले आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर उद्या (ता. ३०)पासून त्याचे प्रत्यक्षात काम सुरू होईल. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुन्हे बैठकीत ही माहिती दिली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी त्याची ‘ट्रायल’ घेतली.

शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचा रोख पाहता पोलिसांनाही काम करणे अवघड झाले आहे. त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या अंगावर जाण्याचे प्रकार घडले आहेत. याची शहानिशा करताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची दमछाक होते. काही पोलिस वादाच्या प्रसंगात स्वतःच्या मोबाईलवरून शूटिंग करीत होते. मात्र, हे सर्वांनाच शक्‍य होत नाही. परिणामी, बटणाला लावण्याचे सूक्ष्म कॅमेरे पोलिसांनी खरेदी केले आहेत.

दहा कॅमेरे असून, प्रत्येक मोक्‍याच्या ठिकाणी असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला ते दिले जाणार आहेत. वादाच्या प्रसंगात तो पोलिस कॅमेऱ्याचे बटण ‘ऑन’ करेल. त्यामुळे तेथे होणारे संभाषण आणि चित्रीकरण दोन्हीही कॅमेऱ्यात कैद होईल. याबाबत कायदेशीर प्रक्रिया करावी लागली तर त्याचा उपयोग पुरावा म्हणून करता येणार आहे. हे सर्व कॅमेरे हातळण्याची सोपी पद्धत आहे. वाहतूक शाखेच्या सर्व पोलिसांना हा कॅमेरा हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. स्वतः शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक धुमाळ यांनी त्याचे प्रात्यक्षिक घेतले. उद्यापासून प्रत्यक्षात त्याचे काम रस्त्यावर सुरू होणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग
ताराराणी चौक, दाभोलकर कॉर्नर, संभाजीनगर, फोर्ड कॉर्नर, उमा चित्रपटगृह अशा महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे हे कॅमेरे असणार आहेत. साधारण अर्ध्या तासाचे रेकॉर्डिंग या कॅमेऱ्यात होईल. आठ जीबी त्याची मेमरी आहे. साधारण दीड-दोन हजार रुपयांचे हे कॅमेरे आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात हा पहिलाच प्रयोग असल्याचेही श्री. धुमाळ यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News button Camera to Traffic police