सीसीटीव्हीमुळे कोल्हापूरातील दंगलीतील अनेकांची ओळख स्पष्ट

सीसीटीव्हीमुळे कोल्हापूरातील दंगलीतील अनेकांची ओळख स्पष्ट

कोल्हापूर - कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर कोल्हापुरात त्याचे पडसाद उमटले खरे; पण त्या दिवशी दगडफेक, नासधूस करणारे, दहशत निर्माण करणारे आज मात्र कारवाईच्या भीतीने गारठले आहेत. चौकाचौकांमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे व काही खासगी व्यक्तींनी दिलेल्या क्‍लिपमुळे दंगलीतील सुमारे ३५० ते ४०० जणांची नावासह ओळख पटली आहे.

त्यातील बहुतेकांनी तात्पुरते कोल्हापूर सोडून जाणे किंवा अज्ञातस्थळी जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे; पण रोज पोलिस त्यांच्या मागावर आहेत. रात्री घरात जाऊन शोध घेत आहेत. कारवाईत केवळ तुफान दगडफेक करणारे बंद समर्थक नाहीत, तर बिंदू चौकात मोटारसायकलींची तोडफोड करणारे व सिद्धार्थनगरात हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाही समावेश आहे. 

दंगलीच्या घटनेनंतर पोलिस मुख्यालयातील सीसीटीव्ही कक्षात सर्व पोलिस ठाण्यांचे गोपनीय, डी. बी. विभाग, पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील पोलिस सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत आहेत. प्रत्यक्ष हिंसक असलेल्या, दगडफेक करणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्या, विचित्र अंगविक्षेप करून चीड निर्माण करणाऱ्या प्रत्येकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. नावाची पडताळणी झाली की, संबंधित दंगलखोर ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतो त्या पोलिस ठाण्यात त्याचा फोटो पाठवला जात आहे. त्याला अटक करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. एकाला अटक केली की, त्याच्याकडून त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्यांची माहिती काढली जात आहे. 

दगडफेक, जाळपोळीच्या प्रत्येक ठिकाणी पोलिस नव्हते; पण जेथे दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा मोठा उपयोग पोलिसांना तपासात झाला आहे. ते सर्व फुटेज पोलिसांनी मिळवले आहेत. ज्या दुकानांवर दंगलखोर दगडफेक करत होते त्या दुकानावरील सीसीटीव्हीत त्यांचे चेहरे टिपले गेले आहेत. आता अटकेची कारवाई सुरू झाल्यानंतर संबंधितांची पळापळ सुरू झाली आहे. आपण त्या दिवशी कोल्हापुरातच नव्हतो, कामावर होतो किंवा अन्य सोयीस्कर पवित्रा बहुतेकांनी घेतला आहे; पण सीसीटीव्ही फुटेजचा मोठा पुरावा असल्यामुळे त्यांना खूप दिवस पळापळ करणे, दडून राहणे अवघड होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com