चहावाला तानाजी झाला फौजदार

सुधाकर काशीद
शुक्रवार, 22 जून 2018

जो येईल, तो तानाजीचे अभिनंदन करत होता. त्याला पेढा भरवत होता. ‘तानाजी तोडलंस’ अशा टिपिकल कोल्हापुरी शब्दात त्याला शुभेच्छा देत होता. तानाजीचे वडील बंडू आडसुळे शांतपणे हे सारे पाहात होते. आपल्या चहाच्या टपरीवर चहा करत होते. चहाचे कप भरत होते.

कोल्हापूर - वाय.पी. पोवार नगरातल्या चहाच्या टपरीवर आजही तानाजी नेहमीप्रमाणे उभा होता; पण आजचा दिवस त्याच्यादृष्टीने खूप वेगळा होता. जो येईल, तो तानाजीचे अभिनंदन करत होता. त्याला पेढा भरवत होता. ‘तानाजी तोडलंस’ अशा टिपिकल कोल्हापुरी शब्दात त्याला शुभेच्छा देत होता. तानाजीचे वडील बंडू आडसुळे शांतपणे हे सारे पाहात होते. आपल्या चहाच्या टपरीवर चहा करत होते. चहाचे कप भरत होते. अर्थात हे करताना आज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे एक वेगळेच तेज झळकत होते.

या साऱ्याला निमित्त होते तानाजी फौजदारपदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे. वाय.पी. पोवार नगरात बंडू आडसुळे यांची चहाची टपरी आहे. 

या टपरीवर तानाजी वडिलांना मदत करीत होता; पण एका वेगळ्या जिद्दीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही करत होता. तो या परीक्षेची तयारी करतोय, हे फारसे कोणाला माहीतही नव्हते; पण आज या परिसरात सर्वांना बंडू चहावाल्याचा मुलगा तानाजी ही परीक्षा पास झाल्याचे कळाले आणि इथले उद्योजक, त्यांचे कामगार तानाजीचे कौतुक करण्यासाठी टपरीकडे वळले. 

तानाजीचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या ताराराणी विद्यालयात व माध्यमिक महाराष्ट्र हायस्कूलमध्ये झाले. बी.कॉम.ची परीक्षा त्याने बहिस्थ विद्यार्थी म्हणून दिली. आठवी ते बारावीपर्यंत त्याने वडिलांच्या चहा गाडीवर काम केले. एका हातात किटली, दुसऱ्या हातात प्रत्येक बोटात अडकवलेला कप अशा तऱ्हेने तानाजी वाय.पी. पोवार उद्योग संकुलात फिरत राहिला. दिवसभर हे काम व रात्री अभ्यास करत राहिला. 

बी.कॉम. झाल्यावर त्याने ‘एमपीएससी’ची परीक्षा देण्याचे ठरवले. त्यासाठी खासगी कोचिंग क्‍लासची फी अर्थातच त्याला परवडणारी नव्हती. त्यामुळे तो महापालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयात रोज सहा ते सात तास अभ्यास करत राहिला. फौजदार परीक्षेस बसला आणि पहिल्याच प्रयत्नात पास झाला. काल रात्री घरात त्याने मोबाईलवर (नेट) निकाल पाहिला आणि आनंदाने आपल्या बापाच्या गळ्यातच पडला.

माझा मुलगा तानाजी कष्ट करायला कधीच लाजला नाही. हातात किटली व चहाचे कप घेऊन त्याने कष्टाचा धडा गिरवला. आज त्याच्या कष्टाचे चीज झाले. माझ्यासारख्या साध्या माणसाला यापेक्षा सर्वोच्च आनंद दुसरा कुठला असणार आहे. 
- बंडू आडसुळे

Web Title: Kolhapur News Chahawala Tanaji pass PSI exam