तृतीयपंथीयांच्‍या गुन्हेगारीचे आव्हान

लुमाकांत नलवडे
गुरुवार, 8 जून 2017

तक्रार कमी, ‘गोलमाल’ जादा - तरुणांच्या आयुष्याला लागतेय वाळवी

कोल्हापूर - सायंकाळी सहा वाजले की त्यांचे नखरे सुरू होतात. एकदा त्यांच्या ताब्यात सापडला की  पुढे ‘ते’ म्हणतील तसेच होणार. लुटले, लुबाडले तरीही अब्रू जाईल म्हणून कोणी ब्र काढत नाही. यातूनच एक-एक गुन्हेगारी वाढत जाते आणि तरुणांच्या आयुष्याला कायमची वाळवी लागते.

तक्रार कमी, ‘गोलमाल’ जादा - तरुणांच्या आयुष्याला लागतेय वाळवी

कोल्हापूर - सायंकाळी सहा वाजले की त्यांचे नखरे सुरू होतात. एकदा त्यांच्या ताब्यात सापडला की  पुढे ‘ते’ म्हणतील तसेच होणार. लुटले, लुबाडले तरीही अब्रू जाईल म्हणून कोणी ब्र काढत नाही. यातूनच एक-एक गुन्हेगारी वाढत जाते आणि तरुणांच्या आयुष्याला कायमची वाळवी लागते.

तृतीयपंथीयांच्या गुन्हेगारीची वाळवी आज पुन्हा एकदा कोल्हापुरात पसरत आहे. सगळे ‘गुपचुप’. त्यामुळे याची नोंदही पोलिस ठाण्याच्या डायरीपर्यंत पोहोचत नाही. पण काल राजारामपुरी खाऊगल्लीत काम करणाऱ्या कामगाराचा बाबूजमाल दर्ग्याजवळ खून झाला आणि पुन्हा एकदा तृतीयपंथीयांचे नाव पोलिस ठाण्यापर्यंत आले. शुभम तानाजी पोवार या २४ वर्षीत तरुणाचा खून झाला. हिना नावाच्या तृतीयपंथीयाचा यामध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून हिनासह काही तृतीयपंथीयांना पोलिसांनी  ठाण्यात बोलविले. हिनाचा सहभाग किती आहे हे तपासात पुढे येईलच; पण या  निमित्ताने तृतीयपंथीयांच्या गुन्हेगारीचा मुद्दा पुढे आला.

हिना, मयूर, बेळगावची गिड्डी, रोहित, महेश, सोनी, अभी अशी काही नावे या गुन्हेगारीशी जोडलेली असल्याची माहिती पोलिसांकडून पुढे येत आहे. यातील काही टोपण नावानेही ओळखली जातात. मिरज, बेळगाव, निपाणी, कोल्हापुरातील तृतीयपंथीयांचे हे गट म्हणजे सूर्यास्तानंतर अंधारात त्यांचेच साम्राज्य अशी स्थिती होती. यात परीख पूल, सांगली फाटा, उचगाव बायबास, व्हिनस कॉर्नर, कोल्हापूर रेल्वे रुळ, टेंबलाई रेल्वे उड्डाणपूलचा काही परिसर, मार्केट यार्ड परिसरातील रेल्वे रूळ ही त्यांची काही महत्वाची ठिकाणे होती. आजही यातील काही ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहे. तरुण मुलांना हेरणे, पुढे आयुष्यात ‘ते’ म्हणतील तसे वागायला लावणे ही त्यांच्या गुन्हेगारीची पद्धत आहे. आकर्षक दिसणे आणि पुरुषांना आकर्षण करण्यासाठी पाहिजे ते कॉमेंन्ट करणे हीच पद्धत आजही उपयोगात आणली जात आहे. याच कारणावरून  शुभम पोवारचा खून झाल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी प्राथमिक तपासात जाहीर केले आहे.

तृतीयपंथ्यांची चेष्टा करायला गेले आणि त्यांची सवय लागून आयुष्यालाच वाळवी लागली. अशीच काहींची अवस्था आज आहे. मात्र सर्वच कारभाग ‘गुपचूप’ असल्यामुळे कितीही शोषण झाले तरीही मुकाट्याने सहन करायचे. पोलिसांत तक्रार दिली तर आब्रु जायची भिती असल्यामुळे तृतीयपंथ्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यास कोणी धजावत नसल्याचे  पोलिसांकडून सांगण्यात येते. दीडवर्षापूर्वी कोल्हापूर पोलिसांनी त्यांचे उच्चाटन केले होते. त्यानंतर त्यांचे अस्तीत्व सांगली-मिरज फाटा, मिरज रेल्वेस्टेशन इंथ पोहचले. हिना तर पुण्यात गेली होती असे सांगण्यात येते. मात्र आज शुभंमच्या जाण्याने त्यांची गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेक तरुणांच्या आयुष्याला लागत असलेलीही वाळवी कोल्हापुरात पसरण्यापूर्वीच ती कायमची रोखण्याचे आव्हान आज पुन्हा एकदा पोलिसांवर आले आहे.

पुन्हा एकदा प्रयत्नांची अपेक्षा 
दीड वर्षापूर्वीच व्हिनस कॉर्नरवर तृतीयपंथ्यांच्या दोन गटात जोरदार मारामारी झाली. पुढे हा वाद पोलिस ठाण्यात पोहचला. तेथे भा.द.वि.स. कलम ३०७ प्रमाणे गुन्हा नोंद झाला. तेंव्हा या तृतीयपंथ्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. आज पुन्हा एकदा असे प्रयत्न अपेक्षीत आहेत.

पुनर्वसन व्हावे 
तृतीयपंथीयांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न शासनाने प्रामाणिक केला आहे. त्यासाठी काही एनजीओंनीही पुढाकार घेतला. वर्षापूर्वी विधी व सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोल्हापुरात दाखल झाले होते. असाच प्रयत्न पुन्हा एकदा कोल्हापुरात झाल्यास तृतीयपंथीयांचे  पुनर्वसन होईल. आणि कळत नकळत त्यांच्या मार्फत होणारी गुन्हेगारीही मोडीत निघण्याची आशा पल्लवित होईल.

Web Title: kolhapur news challenge crime by eunush