फौंड्री उद्योगापुढे कौशल्य विकासाचे आव्हान

अभिजित कुलकर्णी
शुक्रवार, 9 जून 2017

कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी उद्योजक आणि संघटना प्रयत्नशील

कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी उद्योजक आणि संघटना प्रयत्नशील
कोल्हापूर - फौंड्री उद्योगातील तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल होत असून, त्यांना सामोरे जाण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे आव्हान या उद्योगासमोर आहे. देशातील पहिले कम्युनिटी कॉलेज म्हणून कोल्हापुरातील धातुतंत्र प्रबोधिनी यासाठी प्रयत्न करत आहेच; परंतु त्याच्या जोडीला अन्य कौशल्येही कामगारांना आत्मसात करता यावीत, यासाठी राज्यव्यापी व्यापक उपक्रमांची आणि प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे.

फौंड्री उद्योगात हार्ड वर्किंग प्रोसेस असल्याने कुशल मनुष्यबळाचा सुरवातीपासून अभाव आहेच. मोल्डिंग, कोअर मेकिंग, पोअरिंग, शॉट ब्लास्टिंग, फेटलिंग अशा विविध स्तरांवर कामगारांचे कौशल्य पणाला लागत असते. उच्च तापमानात करावे लागणारे काम, त्यामुळे सतत घामाच्या वाहणाऱ्या धारा आणि अशा प्रतिकूल स्थितीतही गुणवत्तेचा समतोल राखणे हे कामगारांबरोबरच या उद्योगासमोरीलही आव्हान आहे. दरम्यान, या उद्योगासाठी आवश्‍यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योजक आणि त्यांच्या संघटनाही सातत्याने प्रयत्नशील आहेत.

कोअर मेकिंग आणि मोल्डिंगसाठी या उद्योगाला विशिष्ट प्रकारची सॅंड लागते. ही सॅंड कोकणातील कासार्डे व फोंडा आणि कर्नाटकातील मंगळूर येथील खाणीतून उपलब्ध होते. उत्खननात ही सॅंड दगड स्वरूपात मिळते. त्यावर क्रशिंग, वॉशिंग आणि रासायनिक प्रक्रिया करून झाल्यानंतर ती वापरात आणली जाते. गेली अनेक वर्षे सातत्याने उत्खनन झाल्यामुळे ही सॅंड आता अपुरी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय, पर्यावरण समतोलासाठी भविष्यात उत्खनन आणि वॉशिंग प्रकल्पावर प्रचंड निर्बंध येणार आहेत.

दरम्यान, वापरलेल्या सॅंडचाही प्रश्‍न आहे. प्रक्रिया करून ती पुन्हा वापरात आणण्यासाठी सॅंड रिक्‍लेमेशन प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतो; पण त्यामधील आर्थिक गुंतवणुकीचा विचार करता लघुउद्योजकांना तो परवडणारा नाही. सध्या मोल्डिंग सॅंड पुन्हा वापरात आणण्यासाठी प्रत्येक फौंड्री उद्योजक प्रयत्नशील आहे. सॅंड प्रकल्पात काम करण्यासाठी अपेक्षित कुशल मनुष्यबळाचा अभाव राहणार हे ओळखून मोठ्या उद्योगांनी स्वतःचे सॅंड रिक्‍लेमेशन प्रकल्प उभारले आहेत. कोअर मेकिंग आणि मोल्डिंगचे काम करण्यासाठीही कुशल मनुष्यबळाचा सध्या अभाव आहे.

पॅटर्न मेकिंग हेही मोठ्या कौशल्याचे काम आहे; पण तेथेही किमान कौशल्याचा अभाव असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोअरिंग हे धोका पत्करून करावे लागणारे काम आहे. येथे किटलीऐवजी क्रेनद्वारे लोखंडाच्या रसाची वाहतूक होत आहे; पण प्रत्यक्षात कामगारालाच हा रस ओतावा लागत असल्याने धोका पत्करून काम करावे लागते.

यासाठी संबंधित कामगाराला कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत नाही. अनुभवातूनच असे कामगार तयार होत असल्याने येथेही कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे.

औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते; पण फौंड्री उद्योगाला लागणाऱ्या पॅटर्न मेकिंग, कोअर मेकिंग, मोल्डिंग, पोअरिंग, शॉट ब्लास्टिंग आणि फेटलिंगचे प्रशिक्षण देणारी एकही संस्था अस्तित्वात नाही. याची कोल्हापूरच्या फौंड्री उद्योगाला खंत आहे.

धातुतंत्र प्रबोधिनीचा आदर्श प्रयत्न
कोल्हापुरातील धातुतंत्र प्रबोधिनीच्या माध्यमातून फौंड्री उद्योगाकरता कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठीचा आदर्श प्रयत्न सुरू आहे. 2013-14 ला कोल्हापुरात या उपक्रमाची सुरवात झाली. येथे कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यात येते. आतापर्यंत सुमारे दीडशेहून अधिक जणांनी येथून पदविका प्राप्त केली आहे.

जागतिक स्पर्धेत फौंड्री उद्योगाला दर्जेदार उत्पादनाबरोबर स्पर्धात्मक दरही द्यायचा आहे आणि नफाही कमवायचा आहे. कष्टाचे काम करणाऱ्या कामगारांची संख्या कमी झाल्याने यंत्र मानवाचा पर्याय तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिला आहे; पण उत्पादन क्षमतेच्या मर्यादेमुळे हे तंत्रज्ञान लघू आणि मध्यम उद्योगांना परवडणारे नाही. अशा परिस्थितीत नफ्यात उद्योग सुरू ठेवण्याचे सर्वांत मोठे आव्हान फौंड्री उद्योगासमोर आहे.
- सुरेंद्र जैन, कोल्हापूर (उद्योजक) संचालक, शिरोली मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन, कोल्हापूर

Web Title: kolhapur news Challenge of Skill Development to foundry business