चंदगड आगार प्रतिनिधीची पंचायत समिती बैठकीतून हकालपट्टी 

सुनील कोंडूसकर
बुधवार, 21 मार्च 2018

चंदगड -  पंचायत समितीच्या मासिक बैठकीला सक्षम अधिकाऱ्यांनी स्वतः हजर रहावे, असे अनेकदा सांगूनही येथील एसटी आगार प्रमुखांनी प्रतिनिधीकडून अहवाल पाठवल्याने संतप्त सदस्यांनी त्याची बैठकीतून हकालपट्टी केली. किमान अहवाल वाचू द्या, अशी त्याची विनंती धुडकावून लावत त्याला बाहेरचा रस्ता दाखविला. उपसभापती अनंत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पारगड सभागृहात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. 

चंदगड -  पंचायत समितीच्या मासिक बैठकीला सक्षम अधिकाऱ्यांनी स्वतः हजर रहावे, असे अनेकदा सांगूनही येथील एसटी आगार प्रमुखांनी प्रतिनिधीकडून अहवाल पाठवल्याने संतप्त सदस्यांनी त्याची बैठकीतून हकालपट्टी केली. किमान अहवाल वाचू द्या, अशी त्याची विनंती धुडकावून लावत त्याला बाहेरचा रस्ता दाखविला. उपसभापती अनंत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पारगड सभागृहात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. 

गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांनी स्वागत केल्यानंतर विभागवार आढाव्याला सुरवात झाली. एसटी आगाराचा आढावा सादर करण्यासाठी प्रतिनिधी उभा राहताच सदस्य दयानंद काणेकर यांनी त्याला रोखले. आगार प्रमुख संदीप पाटील यांनी स्वतः हजर राहून आढावा सादर करणे गरजेचे आहे, असे अनेकदा बजावूनही ते का येत नाहीत, अशी विचारणा केली. त्यावर संबंधित प्रतिनिधीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचे काहीही ऐकून न घेता तुम्ही बैठकीतून बाहेर जा, असे सुनावण्यात आले. किमान अहवाल वाचतो अशी त्याची विनंती धुडकावण्यात आली.

दरम्यान, आठवड्यापूर्वी एसटी चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी आहे. जखमीवर बेळगाव येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुमारे पावणे दोन लाख रुपये खर्च झाले आहेत. एसटी महामंडळाने त्याचे सर्व बिल चुकता करावे, अशी मागणी श्री. काणेकर यांनी केली. ग्रामीण रुग्णालयाजवळील वळण धोकादायक असून रुग्णालयाचा वळणावरील संरक्षक कठडा काढून तिथे तारेचे कुंपण केल्यास पुढील वाहन दिसण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

त्याशिवाय वळणावर उताराला आणि पुढे पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ स्पीड ब्रेकर करण्याबाबत चर्चा झाली. पंचायत समितीच्या संरक्षक कंपाऊंडला लागूनच अनेक वाहने थांबवली जातात. ती सुध्दा वाहतुकीला धोकादायक असून तिथे "नो पार्कींग' चा फलक लावण्याचे ठरले. पंचायत समितीची नूतन इमारत पूर्ण होऊन दिड वर्षे झाली तरी अद्याप फर्निचरचे काम अपूर्ण असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

संबंधित ठेकेदाराकडून त्याचा खुलासा घ्या. त्याचे नाव काळ्या यादीत टाका आणि जोपर्यंत तो काम पूर्ण करीत नाही तोपर्यंत त्याची बिले अदा करु नका, असे बजावण्यात आले. शिक्षण विभागाकडे गटशिक्षणाधिकारी या मुख्य पदासह विस्तार अधिकाऱ्यांची तीन पदे रिक्त असल्याचे केंद्र प्रमुख एम. टी. कांबळे यांनी सांगितले. मानसी दळवी, संस्कृती दोरुगडे, ओम परीट व अनिरुध्द कांबळे या चार विद्यार्थ्यांची इस्त्रो भेटीसाठी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला.

याच वेळी सदस्या रुपा खांडेकर यांनी शिनोळी खुर्द येथील प्राथमिक शाळेतील स्वच्छता गृहाच्या अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात योग्य सुचना द्याव्यात, अशी मागणी केली. यावर तालुक्‍यातील सर्वच शाळांच्या स्वच्छतागृहांबाबत केंद्र प्रमुखांची बैठक बोलावून सुचना देण्याचे ठरले.

जट्टेवाडी, बोंजूर्डी व मोरेवाडी येथे पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर विहीत अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठवल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले. महावितरण कंपनीकडून गेल्या महिन्यात घरगुती 125, शेती पंपाची 118 व औद्योगिक 130 कनेक्‍शन जोडण्यात आल्याचे सहाय्यक अभियंता श्री. लोदी यांनी सांगितले. चंदगड येथील शिवाजी गल्लीतील धोकादायक खांब बदलावा अशी मागणी श्री. काणेकर यांनी केली. मुरकुटेवाडी येथील डीपी धोकादायक असून खबरदारी घ्यावी, अशी मागणी सदस्या विठाबाई मुरकुटे यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्री. हंपीहोळी यांचा निवृत्तीबद्दल तर नवीन हजर झालेल्या के. ए. पाटील यांचा सत्कार झाला. प्रारंभी दिवंगत नेते पतंगराव कदम, अभिनेत्री श्रीदेवी, शास्त्रज्ञ स्टीफन हॉकींग, दौलत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब सुरुतकर, अर्जून पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सदस्य बबन देसाई, नंदिनी पाटील यांनीही चर्चेत सहभाग घेतला. 

चंदगडमधील मीटरच्या खर्चाला मंजूरी नको 
चंदगड शहरातील नळांना बसवलेली मीटर अनावश्‍यक होती. त्यामुळे मीटरवर झालेला खर्च मंजूर करु नये, अशी सुचना श्री. काणेकर यांनी केली. 

Web Title: Kolhapur News Chandgad Panchayat Samitti meeting