साखर उद्योगासमोरील अडचणी सोडविण्यास सरकार प्रयत्नशील - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

कोल्हापूर - राज्यातील साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दोन जानेवारीला बैठक घेण्याचे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील साखर कारखानदारांसोबत चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली.

कोल्हापूर - राज्यातील साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दोन जानेवारीला बैठक घेण्याचे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील साखर कारखानदारांसोबत चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली.

साखर उद्योगांसमोरील अडचणींवर मार्ग काढण्यासाठी आज पालकमंत्री श्री. पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, म्हाडा -पुणेचे अध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे, के. पी. पाटील, पी. एन. पाटील, संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘ऊस हंगाम सुरू होण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेची बैठक झाली. जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपी आणि जादा २०० रुपये देण्याचे मान्य केले होते. साखर हंगाम सुरू झाल्यावर बाजारात साखरेचा दर ३५०० रुपये होता; पण आता हा दर ३०५० रुपये इतका खाली आला. त्यामुळे ऊस उत्पादकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. ऊस उत्पादकांना जादा दर देताना शेवटच्या टप्प्यात ऊस गाळप झालेल्या उत्पादकांना दर देताना अनंत अडचणी येणार आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी राज्य सरकारकडे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून काही मागण्या केल्या. साखरेचा दर वाढवण्यासाठी राज्य सरकारने २० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा. त्यामुळे साखरेचे दर वाढतील. बफर स्टॉक केलेल्या गोदामाचे भाडे सरकारने द्यावे. राज्य सरकारकडून प्रत्येक टनाला जे कर्ज दिले जाते, ते १५ टक्के कापून न घेता १० टक्के कापून ९० टक्के कर्ज मिळावे. २०१३-१४ ला केंद्र सरकारने दिलेल्या कर्जाची पुनर्रचना करावी. गतवर्षीपासून दर टनामागे ३०० रुपये हप्ता भरण्यास सुरवात केली आहे. हप्तामध्ये पुनर्रचना केली तर शेतकऱ्यांना दर देण्यास मदत होणार आहे. साखर कारखान्याकडून जीएसटीची अंमलबजावणी सुरू आहे. राज्य सरकारला जीएसटीतून २००० कोटी रुपये मिळणार असल्याने राज्य सरकारने साखर कारखान्यांना मदतीचा हात पुढे करावा.’’

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘साखरेचे दर खाली आल्याने एफआरपी व वाढीव दोनशे रुपये देण्याबाबत अडचणीवर चर्चा झाली आहे. राज्य बॅंकेकडून साखर कारखान्यांना जे कर्ज दिले जाते, त्यासाठी राज्य सरकारला हमी द्यावी लागणार आहे. साखरेचा बफर स्टॉक व अन्य कराबाबत साखर कारखानदारांनी मागण्या केल्या. साखरेच्या दराचा प्रश्न राज्यव्यापी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित केली जाईल. आज (ता. २९) पुण्यात राज्य साखर संघाने सहकारी व खासगी साखर कारखान्याची बैठक पुण्यात बोलावली आहे. त्यामध्ये आलेल्या मुद्‌द्‌यांची माहिती घेऊन एकूण साखर उद्योगाबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल.’’ 

राजू शेट्टींनी राज्यभर मागणी करावी
कोल्हापूर व सांगलीतील साखर कारखानदारांनी एफआरपी अधिक २०० रुपये दिला. त्यामुळे राज्यभर असाच दर मिळाला पाहिजे, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी करावी, असे या बैठकीत सांगण्यात आले.

खासदारांना टोला
खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत साखर कारखान्यासमोरील अडचणींचा प्रश्‍न मांडल्याचे विचारले असता, आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘शून्य प्रहरात मांडलेल्या प्रश्‍नांची उत्तरे मिळत नाहीत. केवळ प्रश्‍न मांडला असा होतो, सुटत नाही,’’ असे सांगून त्यांनी खासदार महाडिकांना टोला लगावला.

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment