‘मुद्रा’तील कर्जाचे व्याज सरकार भरणार - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

कोल्हापूर - तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मुद्रा बॅंक योजनेतून घेतलेल्या १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे संपूर्ण व्याज शासनामार्फत भरण्याची नवी योजना (व्याज परतावा) शासन राबविणार असून या योजनेची सुरुवात २६ जानेवारीला करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

कोल्हापूर - तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मुद्रा बॅंक योजनेतून घेतलेल्या १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचे संपूर्ण व्याज शासनामार्फत भरण्याची नवी योजना (व्याज परतावा) शासन राबविणार असून या योजनेची सुरुवात २६ जानेवारीला करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

मुद्रा बॅंक जिल्हास्तरीय समन्वय समिती, जिल्हा प्रशासन, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित मुद्रा बॅंक योजना महामेळाव्यात ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळीत, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा अग्रणी प्रबंधक शशिकांत किणिंगे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या तरुण-तरुणींनी व्यवसाय/उद्योगासाठी मुद्रा बॅंक योजनेतून घेतलेल्या १० लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज शासन ‘व्याज परतावा’ योजनेतून त्यांच्या खात्यावर जमा करेल; मात्र त्यासाठी ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास निश्‍चित मदत होणार आहे. मुद्रा योजनेत महाराष्ट्राने देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर तर उर्वरित ग्रामीण महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा क्रमांक १ वर आहे ही या योजनेची यशस्वीता म्हणावी लागेल.’’

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘जीवनात यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या लाखो तरुणांना जिद्द आणि ऊर्मी देण्याचे काम मुद्रा योजनेमुळे होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मुद्रा योजनेचा लाभ लाखो तरुणांना होत आहे. जीवनात काहीतरी करायची जिद्द बाळगणाऱ्या तरुण-तरुणींना मुद्रा योजनेतून कर्ज देण्यासाठी बॅंकांनी नियम आणि व्यवहाराची सांगड घालणे गरजेचे आहे. प्रामाणिक आणि गरजू लोकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी बॅंकांनी सदैव सकारात्मक दृष्टिकोन जोपासावा. मुद्रा महामेळाव्यातील अर्जदारांची अधिकाधिक प्रकरणे मंजूर व्हावीत.’’

आमदार अमल महाडिक सकाळी ११ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आलेल्या लोकांशी संवाद साधत होते. विविध बॅंकांच्या स्टॉलला त्यांनी सातत्याने भेट दिली व सूचना दिल्या.

‘मराठा आरक्षणासाठी नेटाने प्रयत्न’
राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात केस सुरू असून शासनामार्फत नेटाने बाजू मांडली जाईल. मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. तरुणांनी केवळ नोकरीवरच अवलंबून न राहता विविध व्यवसाय उद्योगांमध्ये अधिक सक्रिय व्हावे, असे आवाहनही पालकमंत्री पाटील त्यांनी केले.

Web Title: Kolhapur News Chandrakant Patil comment