नंदगावच्या भामट्याचा ७७ लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

कोल्हापूर - शासकीय खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नंदगाव (ता. करवीर) येथील भामट्याने बीड, मुंबईतील ३६ जणांची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. प्रकाश गणपती जगताप (वय ४०, नंदगाव) असे संशयिताचे नाव आहे.

कोल्हापूर - शासकीय खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नंदगाव (ता. करवीर) येथील भामट्याने बीड, मुंबईतील ३६ जणांची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. प्रकाश गणपती जगताप (वय ४०, नंदगाव) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याबाबत जाब विचारला असता संशयिताने ठार मारण्याची धमकीही दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लखन साहेबराव जाधव (वय २८, रा. एलआयसी कॉलनी, नागझरी, अंबेजोगाई, बीड) हे शासकीय नोकरीच्या प्रयत्नात होते. याच वेळी त्यांचा प्रकाश जगताप याच्याशी संपर्क झाला. शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांत आपले वजन आहे, असे त्याने सर्वांना सांगितले. त्याआधारे प्राप्तिकर खात्यात नोकरी लावतो, असे आमिष दाखवले. त्याला लखन जाधव बळी पडले. 

नोकरीबाबत विचारल्यानंतर दिल्या बनावट ऑर्डर
नोकरीच्या आमिषाने ७७ लाख रुपये दिल्यानंतर नोकरी मिळेल, अशी आशा होती; मात्र त्यानंतर प्रकाशने टाळाटाळ सुरू केली. तसेच पतसंस्थेत भरलेले पैसेही प्रकाशने वेळोवेळी काढून घेतले. पैसे देऊनही नोकरी लागत नसल्याचे पाहून जाधव व त्यांच्या मित्रपरिवार, नातेवाइकांनी प्रकाशकडे विचारणा केली. त्या वेळी त्याने त्यांना नोकरीच्या बनावट ऑर्डर त्यांना दिल्या.

लखन जाधव यांनी नोकरी लावण्याच्या बदल्यात मे २०१७ मध्ये कोल्हापुरातील भवानी मंडपात तीन लाख रुपये प्रकाश जगतापला दिले. त्यानंतर त्याने जाधव यांना आपण आरोग्य, बीएसएनएल, आरटीओ, जलसंपदा विभाग, राष्ट्रीयीकृत बॅंका, रेल्वे, अन्नपुरवठा विभाग आदी ठिकाणीही संपर्कावर इतरांनाही नोकऱ्या लावू शकतो, असे सांगितले. ही माहिती जाधव यांनी आपल्या नातेवाईक व मित्रपरिवाराला दिली.

शासकीय नोकरी मिळणार असल्याने नातेवाईक व मित्रपरिवार अशा ३६ जणांनी नोकरी लावण्याच्या बदल्यात जाधव यांच्या मध्यस्थीने २७ मे २०१७ ते १८ ऑगस्ट २०१७ या कालावधीत एकूण ७७ लाख रुपये दादर, मुंबई आदी ठिकाणी दिले. ही रक्कम त्यांनी कोल्हापुरातील बाबूजमाल परिसरातील एका पतसंस्थेच्या खात्यावर जमा केली होती. 

पैसे देऊनही नोकरी देण्याबाबत प्रकाशने टाळाटाळ केली. खूपच मागे लागल्यानंतर प्रकाशने बनावट ऑर्डर दिल्या. त्या ऑर्डर घेऊन संबंधित खात्यात गेल्यानंतर त्या ऑर्डर बनावट असून आपली फसवणूक झाल्याचे जाधव व त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यामुळे संबंधितांनी प्रकाशकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला; पण त्याने उलट जाधव यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अखेर जाधव यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाशवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली. यापूर्वी त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे करीत आहेत. सायंकाळी त्याला तपासासाठी विविध भागांत फिरवण्यात आले.

Web Title: Kolhapur News cheating case in Nandgaon