इचलकरंजीत रसायनमिश्रित सांडपाणी थेट गटारीत सोडल्याचे उघड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

इचलकरंजी - येथील पर्यावरण दक्षता पथकाने प्रदूषणाबाबत आज सीईटीपीसह तीन ठिकाणी पाहणी केली. यात प्रदूषणाला कारणीभूत असणारे घटक प्रक्रिया न करताच थेट बाहेर सोडण्यात येत असल्याचे उघडकीस आले.

इचलकरंजी - येथील पर्यावरण दक्षता पथकाने प्रदूषणाबाबत आज सीईटीपीसह तीन ठिकाणी पाहणी केली. यात प्रदूषणाला कारणीभूत असणारे घटक प्रक्रिया न करताच थेट बाहेर सोडण्यात येत असल्याचे उघडकीस आले. पथकाकडून पाहणी अहवाल मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर कारवाईची पुढील प्रक्रिया चालणार आहे. पथकाने काही प्रोसेस व सायझिंग उद्योगांची पाहणी केली होती. त्यात रासायनिक सांडपाणी थेट गटारीत सोडले होते. त्यानंतर संबंधित उद्योगांना खुलासा करण्याच्या नोटिसा लागू केल्या होत्या.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आज पथकाने तीन ठिकाणी पाहणी केली. यामध्ये प्रोसेस उद्योगावर प्रक्रिया करणाऱ्या सीईटीपी प्रकल्पातून सांडपाणी थेट ओढ्यात सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. कत्तलखाना येथील भेटीतही प्रदूषणाचा गंभीर प्रश्न उघडकीस आला. जनावरांचा मैला व अन्य टाकाऊ घटक थेट ओढ्यात सोडण्यात येत असल्याचे दिसून आले. शहापूर येथील एका रंगणी उद्योगाला भेट दिली. यामध्ये कापडावर प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी थेट गटारीत सोडण्यात आल्याचे पुढे आले.

पथकात राजू आरगे, संतोष हत्तीकर व आसावरी सुतार यांचा समावेश आहे. या पथकाने संबंधितांना प्रदूषण रोखण्याबाबत सूचना केल्या आहेत. 

Web Title: Kolhapur news chemical drain water in Panchaganga issue