...अखेर ‘चिकोत्रा’ची गळती काढली

प्रकाश कोकितकर
गुरुवार, 5 जुलै 2018

सेनापती कापशी - झुलपेवाडी येथील चिकोत्रा प्रकल्पात पहिल्यांदा पाणीसाठा झाल्यापासून प्रकल्पाला गळती असल्याची लोकांची तक्रार होती. अखेर त्याला मुहूर्त मिळाला आणि गळती काढण्यात आली. प्रकल्पात अनेक मार्गांनी पाणी येण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पंधरा वर्षे या गळतीकडे दुर्लक्ष झाले होते.

चिकोत्रा हा येथील कागल, भुदरगड व राधानगरी या तीन तालुक्‍यांतील सुमारे ३० गावांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न झाला आहे. कागल तालुक्‍यातील हाच परिसर पाण्यापासून वंचित राहिला आहे. प्रकल्प २००० मध्ये झाला; मात्र १७ वर्षांच्या इतिहासात केवळ तीन वेळा पूर्ण क्षमतेने भरला. प्रकल्प भरण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली.

त्यानंतर म्हातारीच्या पठारावरून काही प्रमाणात पाणी मिळाले; मात्र त्या काळात साठलेल्या पाण्यातीलही सुमारे सव्वा क्‍युसेक (सुमारे ३५ लिटर प्रति सेकंद) पाणी वाया जात होते. सर्व्हिस गेटमध्ये बिघाड असल्याने ही गळती होती. गेल्यावर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवल्याने त्याची दाहकता अधिकच जाणवली. म्हातारीचे पठार, आरळगुंडीचे पठार येथून पाणी आणण्यासाठी उपाययोजना होऊ लागल्या असताना या गळतीकडेही लक्ष वेधण्यात आले.

गेल्या जूनपासून येथे ४३८ मि.मी. पाऊस झाला. त्याला जोर नसल्याने प्रकल्पापर्यंत केवळ १५ दशलक्ष घनफूट पाणी आले. त्यामुळे जुन्या साठ्यात केवळ एक टक्‍क्‍याची वाढ झाली आणि प्रकल्पाचा पाणीसाठा १३ टक्‍क्‍यांवर पोचला.

गेल्या आठवड्यात पुणे येथील पाटबंधारेच्या तांत्रिक विभागाने काम सुरू केले. यात प्रकल्प बांधल्यानंतर प्रथमच रोलर व सी बीम बदलले. त्यामुळे प्रकल्पाची गळती थांबली आहे.
- आर. आय. पाटील,
प्रकल्प उपअभियंता. 

Web Title: Kolhapur News Chikotra Project water leakage issue