चौक, आयलॅंडचा लुक बदलणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

महापालिका-केएसबीपीची उपक्रम - ३० चौकांचे होणार सुशोभीकरण

कोल्हापूर - शहरातील प्रमुख चौक तसेच ट्रॅफिक आयलॅंडचे सुशोभीकरण होणार आहे. महापालिका आणि केएसबीपीच्या वतीने ३० चौकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे. महापौर हसीना फरास तसेच केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

महापालिका-केएसबीपीची उपक्रम - ३० चौकांचे होणार सुशोभीकरण

कोल्हापूर - शहरातील प्रमुख चौक तसेच ट्रॅफिक आयलॅंडचे सुशोभीकरण होणार आहे. महापालिका आणि केएसबीपीच्या वतीने ३० चौकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे. महापौर हसीना फरास तसेच केएसबीपीचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

राज्य शासनाच्या पर्यटन धोरणानुसार २०२५ पर्यंत ३० हजार कोटींची उलाढाल पर्यटनाच्या माध्यमातून होणार आहे. कोल्हापुरात दरवर्षी सुमारे ५६ लाख पर्यटक येतात. ३० हजार कोटीतील जास्तीत जास्त महसूल कोल्हापुरच्या वाट्याला यावा यासाठी सौंदर्यीकरणावर भर देण्यात येत आहे. महापालिका आणि केएसबीपी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे पुढील दहा वर्षांसाठी सामंजस्य करार करत आहे. प्रत्येक चौकाच्या सुशोभीकरणाचा खर्च उचलण्यास संस्थांनी तयारी दाखविली आहे.

आयलॅंडच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी केएसबीपीवर असेल. यासंबंधीचे डिझाईन आयुक्त तसेच महापौर कार्यालयाला दिले आहे. केएसबीपीतर्फे समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. दर्जा, देखभाल दुरूस्ती यावर केएसबीपीचे नियंत्रण राहील. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स व केएसबीपी दाभोळकर चौकाचे सुशोभीकरण करतील. गंगावेस चौकाचे सुशोभीकरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्‍टस, अर्बन बॅंक आणि केएसबीपी करणार आहे. केएसबीपीसंबंधी काही सदस्यांचे गैरसमज झाले होते. प्रशासनाची यात चूक होती, मात्र हा संयुक्त उपक्रम असून याकामी सर्वच सदस्य साथ देतील, असेही त्यांनी सांगितले. 

आयलॅंड उभारण्याबरोबर देखभाल दुरुस्तीमध्येही केएसबीपी कुठेही कमी पडणार नाही. सहा महिन्यात जास्तीत जास्त आयलॅंड पूर्ण करण्याचा विचार आहे. आयलॅंड उभारल्यानंतर कोणी विद्रुपीकरणाचा प्रयत्न केल्यास त्यांना तातडीने नोटीस देण्याची कायद्यात तरतूद आहे. 

या वेळी उपमहापौर अर्जुन माने, महिला बालकल्याण सभापती वहिदा मुजावर, सभागृह नेता प्रवीण केसरकर, प्रभाग समिती सभापती सुरेखा शहा, आदिल फरास उपस्थित होते. 

नियोजित चौक व आयलॅंड असे...
ताराराणी चौक, तावडे हॉटेल चौक, सदर बाजार, धैर्यप्रसाद चौक, कोयास्को चौक, हॉटेल पंचशील, दाभोळकर कॉर्नर, ट्रेड सेंटर, व्हीनस कार्नर, विद्यापीठ चौक, सायबर चौक, अयोध्या चित्रमंदिर, बिंदू चौक, सीपीआर चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, भगवा चौक, जयंती नाला, पोलिस मुख्यालय चौक, शिवाजी पूल चौक, सीबीएस, गंगावेस, रंकाळा स्टॅन्ड, तोरस्कर चौक, टाकाळा चौक, माऊली चौक, बागल चौक, पोस्ट ऑफिस, शाहू मिल चौक, मिरजकर तिकटी.

Web Title: kolhapur news chowk island look change