यंत्रमाग कामगारांच्या संपामुळे कापड उत्पादन ठप्प

पंडित कोंडेकर
मंगळवार, 2 जानेवारी 2018

इचलकरंजी - यंत्रमाग कामगारांनी सुरु केलेल्या काम बंद आंदोलनचा परिणाम शहरातील प्रत्येक घटकांवर होण्यास सुरुवात झाली आहे. या आंदोलनामुळे दररोज सुमारे 50 लाख मिटर कापड उत्पादन ठप्प झाले आहे.

इचलकरंजी - यंत्रमाग कामगारांनी सुरु केलेल्या काम बंद आंदोलनचा परिणाम शहरातील प्रत्येक घटकांवर होण्यास सुरुवात झाली आहे. या आंदोलनामुळे दररोज सुमारे 50 लाख मिटर कापड उत्पादन ठप्प झाले आहे. याप्रश्‍नी तातडीने मार्ग न निघाल्यास शहरातील आर्थिक परिस्थीती कोलमडून पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

मजुरीवाढीच्या प्रश्‍नावर यंत्रमाग कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आज आंदोलनचा दुसरा दिवस होता. या आंदोलनामुळे शहरातील हळूहळू सर्व यंत्रमाग बंद पडत चालले आहेत. मुळात शहरातील अर्थकारण हे यंत्रमाग उद्योगावर अवलंबून आहे. यंत्रमागाचे चाक बंद पडल्यास त्याचा सर्व घटकांवर परिणाम होतो. मुळात आर्थिक मंदीतून हा उद्योग जात असतांना मजुरीवाढीच्या प्रश्‍नामुळे या उद्योगाची स्थिती अधिकच बिकट होण्याच्या मार्गावर आहे.

या आंदोलनामुळे कापड उत्पादनात मोठी घट झाली आहे. दररोज सुमारे 50 लाख मिटर कापडाचे उत्पादन ठप्प झाले आहे. कापड उत्पादन ठप्प झाल्यामुळे पुढील सर्व प्रक्रिया थांबणार आहे. आंदोलनामुळे पुढील एक दोन दिवसांत तर सर्वच यंत्रमाग कारखाने बंद पडण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम थेट प्रत्येक घटकांवर होणार आहे. त्यामुळे या आंदोलनाचा फटका अनेक घटकांना बसणार आहे. 

शासनाने या उद्योगाला आवश्‍यक ते सहाय्य केलेले नाही. किंबहुना शासन पातळीवर या उद्योगाबाबत उदासिन भूमिका राहिली. पण कांही तरी मिळेल, या आशेवर येथील यंत्रमाग उद्योजक कापड उत्पादन करीत आहे. पूर्वी शहरात सव्वा लाख यंत्रमागाची संख्या सांगितली जात होती. आता मात्र ही संख्या एक लाखापर्यंत खाली आली असल्याचे एका जाणकार उद्योजकांने सांगितले. यावरुन या उद्योगाचे भवितव्य लक्षात येण्यासारखे आहे.

या उद्योगासमोर आता कामगारांच्या मजुरीवाढीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रशासनाने जाहीर केलेली तीन पैशाची मजुरीवाढ यंत्रमाग उद्योजकांना द्यावी लागणार आहे. पण जास्त मजुरीवाढीच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरु आहे. आंदोलनाला कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे यंत्रमागाची धडधड थांबू लागली आहे. त्याचा परिणाम शहरातील सर्व घटकांवर होत आहे. त्यामुळे तातडीने निर्णय न झाल्यास शहरातील सर्वच घटकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Kolhapur News cloth production stop due to workers strike