कोल्हापूर थंडीचा वाढला कडाका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

गायब झालेली ही थंडी १९-२० जानेवारीपासून पुन्हा सक्रिय झाली. त्यामुळे वातावरण आल्हाददायक बनले. सोमवारी सकाळी कमाल तापमान २७, तर किमान १६ अंश, दुपारी ३३/३० अंश, संध्याकाळी २७/१८ अंश, मध्यरात्री १३/१४ पर्यंत होते. सायंकाळी सहानंतर तर पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे शहर गारठले. आज सकाळी किमान तापमान 19 अंश आहे.

कोल्हापूर - जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी गायब झाली आणि पाहता पाहता उन्हाचा कडाका वाढला होता. मकर संक्रांतीला तर घामाच्या धारा वाहिल्या. कोरडे वारे सर्वत्र वाहत होते. थंडी गायब झाल्यासारखी स्थिती होती; मात्र मध्येच गायब झालेली ही थंडी १९-२० जानेवारीपासून पुन्हा सक्रिय झाली. त्यामुळे वातावरण आल्हाददायक बनले. सोमवारी सकाळी कमाल तापमान २७, तर किमान १६ अंश, दुपारी ३३/३० अंश, संध्याकाळी २७/१८ अंश, मध्यरात्री १३/१४ पर्यंत होते. सायंकाळी सहानंतर तर पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे शहर गारठले. आज सकाळी किमान तापमान 19 अंश आहे.

सोमवारी दिवसभर आर्द्रतेचे प्रमाण ३४ टक्के राहिले. आकाश पूर्णपणे निरभ्र असूनही सूर्यकिरणांचा चटका जाणवला नाही. उत्तर भारत, राजस्थानमधील तापमान, हिमालयाचा पायथा, वेस्टर्न डिस्टर्बन्स फॅक्‍टर आदींचा नित्य प्रभाव महाराष्ट्रातील थंडीवर पडत असतो. उत्तर भारतातील तापमानात घट झाल्याने निर्माण झालेल्या थंडीच्या लाटांनी भर दुपारी तापणारा महाराष्ट्र थंड केला. कोल्हापूर परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून पहाटे पाच ते सकाळी नऊ दरम्यान धुक्‍याची दाट चादर पसरलेली असते. धुक्‍यामुळे वातारणातील दवबिंदूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. याचा फायदा हिरवा वाटाणा, हरभरा, गहू, भाजीपाल्याला होणार आहे. 

थंडीमुळे चहा टपऱ्या, हॉटेलमध्ये गर्दी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत गुंडाळून ठेवलेल्या कानटोप्या, हातमोजे, पायमोजे, स्वेटर्स, जॅकेटस्‌ पुन्हा बाहेर काढून अनेकजण सकाळी फिरायला बाहेर पडत आहेत. सकाळी, सायंकाळी, मध्यरात्री थंडीचा प्रभाव जास्त असल्याने सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. सायंकाळी, सकाळी शेकोट्या पेटवून अनेक ठिकाणी गप्पांचे फड रंगत आहेत.

Web Title: Kolhapur News Cold spell in Kolhapur