जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज ध्वजवंदन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय सोहळा उद्या (ता. 15) सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. 

कोल्हापूर - भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय सोहळा उद्या (ता. 15) सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. 

कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व कार्यक्रमांची तयारीही पूर्ण झाली आहे. 

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजास बंदी 
स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली असून राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा, तसेच त्याचा अवमान होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांनी केले. दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनावेळी विद्यार्थी तसेच नागरिकांकडून कागद, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. हा कार्यक्रम पार झाल्यानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्ततः पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतुदीमध्ये नमूद केल्यासारखाच करावा. हे शासन परिपत्रक www.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 कलम दोननुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांनी सूचित केले. 

सर्वात उंच ध्वजही आज फडकणार 
""पोलिस मुख्यालयासमोरील पोलिस गार्डनमध्ये असलेला सर्वात उंच ध्वज उद्या (मंगळवारी) सकाळी फडकविण्यात येईल. हा ध्वज साधारण चार चौरस फुटाचा असल्याने त्याला ध्वजस्तंभावर चढविण्याची पूर्वतयारी आज रात्रीपर्यंत सुरू होती. शनिवारी, रविवारी तरी हमखासच व काही दिवसांनंतर वाऱ्याचा अंदाज घेऊन तो रोजच फडकलेला दिसेल'', असे केएसबीपीचे सुजय पित्रे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

श्री. खोत यांचा दौरा 
श्री. खोत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्याचा कार्यक्रम असा : 
मंगळवारी (ता. 15) सकाळी 8.30 वाजता सांगली येथून मोटारीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होईल. सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रमस्थळी आगमन होईल. 9.15 वाजता शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा जिल्हा परिषद, महापालिका, आरोग्य विभाग, सामाजिक वनीकरण पारितोषिक समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहतील. 10 वाजता कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे गेट बंद करून चालू वर्षीच्या पावसाळ्यात 100 टक्के पाणीसाठा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल. यानंतर इस्लामपूरकडे प्रयाण करतील. 

स्वाभिमानीचा सहभाग नाही 
संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील सुकाणू समितीच्या वतीने उद्या (ता. 15) मंत्र्यांना ध्वजवंदन करू दिले जाणार नाही, असा इशारा दिला आहे; पण या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग नसेल. स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण असल्याने त्याला गालबोट लागू नये, म्हणूनच या आंदोलनापासून स्वाभिमानी दूर असेल; तथापि सुकाणू समितीच्या इतर आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी दिली. 

पोलिसांचे संचलन 
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी शहर परिसरात संचलन केले. यामध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी दुचाकी, चारचाकीसह सहभागी झाले होते. अनेकांनी रस्त्याच्या बाजूला थांबून उत्सुकतेने हे संचलन पाहिले. स्वातंत्र्य दिनासाठी हे संचलन करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: kolhapur news collector office 71th Independence Day