कोल्हापूरात स्थानिक ब्रोकरसह कंपनीवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

कोल्हापूर - डॉक्‍टरांची २८ लाख ८७ हजारांची फसवणूक करणाऱ्या एन्जल ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह स्थानिक ब्रोकर कुणाल भरत कामत (रा. शिवाजी पेठ) याच्यावर आज गुन्हा दाखल झाला.

कोल्हापूर - डॉक्‍टरांची २८ लाख ८७ हजारांची फसवणूक करणाऱ्या एन्जल ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसह स्थानिक ब्रोकर कुणाल भरत कामत (रा. शिवाजी पेठ) याच्यावर आज गुन्हा दाखल झाला. ‘डी मॅट’ अकाउंटद्वारे शेअर्सची परस्पर खरेदी-विक्री करून चार डॉक्‍टरांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद डॉ. अभिजित आप्पासाहेब पाटील (वय ४२, रा. माळी कॉलनी, राजारामपुरी) यांच्यासह चार डॉक्‍टरांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, अंधेरी पूर्व मुंबईच्या एंजल ब्रोकिंग कंपनीचा सबब्रोकर म्हणून कुणाल कामत हा काम करतो. त्याची ओळख डॉ. अभिजित पाटील यांच्याशी साईक्‍स एक्‍स्टेंशन येथे वर्धन हॉस्पिटलमध्ये झाली. कुणालने वर्धन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ. पाटील यांच्या ओळखीचा फायदा घेऊन १४ जुलै २०१४ ला त्यांच्याकडून धनादेश घेतले.

त्याआधारे त्यांचे ‘डी मॅट’ अकाउंट काढले. या खात्यावरून त्याने शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले. सुरवातीला त्याचा परतावा दिला. यातून त्याने डॉ. पाटील यांच्यासह इतर डॉक्‍टरांचाही विश्‍वास दृढ केला. त्या सर्वांकडून त्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी रक्कम घेतली. त्यानंतर त्याने सर्वांच्या खात्यावरून परस्पर शेअर्सची खरेदी-विक्री केली. याबाबत डॉ. पाटील यांना अंधारात ठेवले. 

गुंतवलेल्या रकमेचा परतावा वेळेत मिळत नसल्याबाबत त्यांनी ब्रोकर कुणालकडे विचारणा केली; मात्र तो वेळ मारून नेत असल्याचे लक्षात आले. अचानक सहा महिन्यांपूर्वी अकाउंटवर शून्य बॅलन्स झाल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. यामुळे डॉक्‍टरांना काहीच कळाले नाही. त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली, तेव्हा कुणालने माहिती देण्यास टाळाटाळ केली.

तोटा झाला असल्याचे दाखवले. त्याने कायदेशीर बाबी पूर्ण केल्यात की नाहीत याची माहिती डॉक्‍टरांनी मिळवली. यानंतर संबंधित डॉक्‍टरांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे निवेदनवजा तक्रार देऊन चौकशी करण्याची विनंती केली; मात्र तेथे दुर्लक्ष केले गेले. अखेर पोलिसांत एफआयआर दाखल करण्याची विनंती डॉकटरांनी केली. यानंतर हे सर्व प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते, आर्थिक गुन्हे शाखेचे बी. आर. शेडे यांच्याकडे गेले. त्यांनीही न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.

सहा महिन्यांचा फॉलोअप घेतल्यानंतरही फिर्याद दाखल करून घेतली नाही. अखेर डॉक्‍टरांच्या टीमने थेट विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या एका फोनवर ४८ तासांत गुन्हा दाखल करून घेणे पोलिसांना भाग पडले. काल रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित कुणाल व एंजल ब्रोकिंग कंपनीने स्वतःची ९ लाख ८० हजार रुपयांची; तर इतर तीन साक्षीदार डॉक्‍टरांची मिळून एकूण २८ लाख ८७ हजारांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. आणखी कोणाची कुणालने फसवणूक केली आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. 

लवादाकडे चौकशी सुरू
शेअर मार्केटमध्ये फसवणूक झाल्यास त्याची चौकशी करण्याचे अधिकारही लवादाकडे आहेत. त्यानुसार डॉकटरांनी लवादाकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांची चौकशी सुरू आहे. 

फसवणूक झालेले डॉक्‍टर व रक्कम 
 डॉ. अभिजित पाटील - ९,८०,०००
 डॉ. विठ्ठल भोसले - २,२०,०००
 डॉ. विद्या ठकार - ११,३५,०००
 डॉ. प्रसाद देसाई - ५,२२,०००

Web Title: Kolhapur News complain filled on Engal Broker Company

टॅग्स