कुरुंदवाडमध्ये शरद पवार यांच्या फोटोचा अवमान 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

कुरुंदवाड - राष्ट्रवादीचे संस्थापक, माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या फोटोचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पालिकेवर मोर्चा काढून प्रशासनाला धारेवर धरले.

कुरुंदवाड - राष्ट्रवादीचे संस्थापक, माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या फोटोचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पालिकेवर मोर्चा काढून प्रशासनाला धारेवर धरले.

नगराध्यक्ष जयराम पाटील यांना निवेदन देत फोटो अवमानप्रकरणी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना निलंबित करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चंगेजवान पठाण यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा निघाला. ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष जिन्नाप्पा पोवार यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. 

दरम्यान नगराध्यक्ष श्री. पाटील यांनी याची गंभीर दखल घेत निषेध व्यक्‍त करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. 
शरद पवार यांचा पालिका सभागृहात फोटो होता काही काळापूर्वी हा फोटो गायब झाला. याची माहिती मिळताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अचानकपणे हल्लाबोल केला. सकाळी नगराध्यक्ष जयराम पाटील पालिका चौकात आले. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले व पवार फोटो अवमानप्रकरणी मुख्याधिकारी श्री. मुतकेकर यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिले. माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस खान पठाण, बाळासाहेब गायकवाड, जिन्नाप्पा पोवार, प्रा. सुनील चव्हाण, आप्पा बंडगर यांनी या प्रकरणी प्रशासनावर कारवाईचा आग्रह धरला.

श्री. पठाण यांनी या प्रकराची माहिती नेते हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांना देणार असून त्यांच्यावरोधात विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करणार आहे असे सांगितले. शिवाय नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी घडलेला प्रकार दुदैवी असून त्याची गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. 

मोर्चात उपनगराध्यक्ष किरण जोंग, नगरसेवक जवाहर पाटील, दीपक गायकवाड, शिवसेनेचे राजू आवळे, विजय पाटील, अजित देसाई, दिपक परीट, बबलू पोवार, प्रा. चंद्रकांत मोरे, रमेश भुजूगडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

Web Title: Kolhapur News Contempt of Sharad Pawar photo