पंचसूत्रीच्या जोरावर यशस्‍वी व्हा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - ॲटिट्यूड, फिटनेस, फिल्डिंग, बॅटिंग व बॉलिंग या पंचसूत्रीच्या जोरावर उत्कृष्ट क्रिकेटपटू होता येते. वेस्टर्न क्रिकेटचे अंधानुकरण न करता क्रिकेट खेळा. क्रिकेट खेळताना तुम्ही काय आहात, हे लक्षात घ्या आणि कठोर परिश्रम करा. तुम्हाला क्रिकेटमध्ये उज्ज्वल भविष्य आहे, असा कानमंत्र विविध वक्‍त्यांनी आज येथे दिला. 

कोल्हापूर - ॲटिट्यूड, फिटनेस, फिल्डिंग, बॅटिंग व बॉलिंग या पंचसूत्रीच्या जोरावर उत्कृष्ट क्रिकेटपटू होता येते. वेस्टर्न क्रिकेटचे अंधानुकरण न करता क्रिकेट खेळा. क्रिकेट खेळताना तुम्ही काय आहात, हे लक्षात घ्या आणि कठोर परिश्रम करा. तुम्हाला क्रिकेटमध्ये उज्ज्वल भविष्य आहे, असा कानमंत्र विविध वक्‍त्यांनी आज येथे दिला. 

जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘क्रिकेट काल, आज आणि उद्या’ परिसंवादात ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये त्याचे आयोजन केले होते. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांनी वक्‍त्यांची मुलाखत घेतली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी प्रास्ताविक केले. चेतन चौगुले, रमेश कदम, केदार गयावळ उपस्थित होते.

क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले  
२०११ला पर्थ मैदानावरील कसोटी मालिका भारतीय संघ हरला होता. कसोटीच्या चौथ्या दिवशी सचिन तेंडुलकरची भेट घ्यायला गेलो. तो दुपारी अडीचच्या उन्हात क्रिकेटचा सराव करत होता. अपयश जितके जास्त तितका सराव अधिक, हे त्याचे सूत्र होते. राहुल द्रविडने झेल पकडण्याचे रेकॉर्ड केल्यानंतर त्यालासुद्धा भेटायला गेलो, तर तो जिममध्ये व्यायाम करताना दिसला. खेळाडूंनो, ही असते खेळाविषयी बांधिलकी. जी दोघांच्या शरीरात भिनली होती. सचिनच्या ऐंशी  शतकांच्या बातम्यांचे संकलन करण्याचा अनुभव माझ्यासाठी विशेष होता. एका रोपट्याचे महावृक्षात रूपांतर होताना मी पाहत होतो. पाल्याने २५ किंवा ५० धावा काढल्यावर आपण त्याचे कौतुक करतो. सचिनने शतक ठोकले, तरी त्याचे कौतुक प्रशिक्षकांनी केले, ना त्याच्या भावाने. कौतुकाने सचिनच्या धावांचा प्रवास खुंटू नये, ही त्यांची त्यामागची भावना होती. शालेय, महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय क्रिकेटमध्ये मागे पडत चाललो आहोत. ओरिजिनल क्रिकेटला आपण मुकत आहोत. 

माजी रणजीपटू मिलिंद कुलकर्णी  
मी मूळचा कोकणातला. माझे क्रिकेट वयाच्या अठराव्या वर्षी सुरू झाले आणि बावीसाव्या वर्षी मी रणजी कॅम्पमध्ये सहभागी झालो. कोल्हापुरात असताना मी फुलेवाडीत राहत होतो. तेथून सायकलवरून शिवाजी विद्यापीठात सरावासाठी येत होतो. शशी घोरपडे आमचा फिटनेस घ्यायचे. त्यांचा वचक मोठा होता. ते मैदानावर दिसताच सराव करून थकलेले खेळाडू पुन्हा सराव करायचे. कोल्हापुरात खेळत असल्याने माझा बेसिक फिटनेस चांगला होता. पुण्यातील खेळाडूंचे प्रॅक्‍टिस प्लस फिनिशिंग, तर मुंबईतील खेळाडूंना वर्षभरात विविध खेळाडूंबरोबर खेळावे लागते. रणजी संघात असताना सुरेंद्र भावे आमचे कर्णधार होते. त्यांच्यासाठी मी व इक्‍बाल हे डोकेदुखीचे बॉलर होतो. आमच्यात जादा विकेट घेण्याची इर्षा असायची. ज्याचा परिणाम संघाच्या विजयात दिसायचा. खेळाडूंमध्ये संघाच्या विजयासाठी इर्षा असणे आवश्‍यक आहे. 

महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार व प्रशिक्षक सुरेंद्र भावे 
महाराष्ट्र क्रिकेट संघाचा विचार करता पुण्यातून फलंदाज, तर अन्य जिल्ह्यातून गोलंदाज मिळत असल्याचा अनुभव आहे. कोल्हापुरातील रमेश हजारे उत्कृष्ट ऑफ स्पिन बॉलर. ज्यांनी दहा वर्षे महाराष्ट्र संघात पहिल्या पंधरा खेळाडूंत 
स्थान मिळविले होते. तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात त्यांनी सात गडी बाद केले होते. कोल्हापूरने अनेक खेळाडू महाराष्ट्राला दिले आहेत. प्रशिक्षक व खेळाडू यांच्यातील ‘रिलेशनशिप’विरुद्ध बोलायचे तर संघात सर्व खेळाडू समशेर बहाद्दर असतील, तर प्रशिक्षकाने आपली तलवार म्यान करण्यात अपमान वाटून घेऊ नये. खेळाडूंना मार्गदर्शन करत राहावे. संघाची प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध डावपेचाची तयारी करावी. खेळाडू जेव्हा सामना जिंकून घरी आनंदात परततात, तो आनंद प्रशिक्षकासाठी मोठा असतो.

 माजी कसोटीपटू अमृता शिंदे 
कठोर सराव, बांधिलकी व त्याग या त्रिसूत्रीत खेळाडूचे भविष्य घडत असते. खेळाडूने सर्व परिस्थितीचा सामना करण्याचा निर्धार केला तर तो क्रिकेटमध्ये यशस्वी झाल्याखेरीज राहत नाही. माझा प्रवास शाहूपुरी जिमखाना मैदानावरून सुरू झाला. मुलगी आहे, कसे खेळणार असा नकारात्मक विचार मनात न आणता मी खेळत राहिले. क्रिकेटप्रेमींच्या २०१७ चा वर्ल्ड कप लक्षात राहिला आहे. मात्र, २०१३ चा कोठे झाला याची माहिती किती जणांना आहे? त्या वर्ल्ड कपमध्ये प्रशिक्षक तुषार आरोटे यांनी भारतीय संघात दहा बदल केले होते. त्यांचे प्रशिक्षण पाहता त्यांना पुन्हा प्रशिक्षक म्हणून ठेवले गेले आहे. एक प्रशिक्षक हा खेळाडूंचा सच्चा मित्र असला, तर खेळाडू पूर्ण ताकदीनिशी सामना जिंकून प्रशिक्षकाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात.  

माजी रणजीपटू अवधूत झारापकर 
मुंबई क्रिकेटचे टूर्नामेंट स्ट्रक्‍चर खूप चांगले आहे. तेथील युनिव्हर्सिटी क्रिकेटमधून सुनील गावस्कर, सुधीर नाईक, मिलिंद रेगे, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर असे खेळाडू महाराष्ट्राला दिले आहेत. जादा क्रिकेट खेळायचे असेल, तर मुंबईला पसंती द्यावे लागेल. जेथे खेळाडूंचा कस लागतो आणि क्रिकेटचा भरपूर सराव होतो. मुंबईत क्रिकेटच्या दोनशे दिवसांच्या हंगामात त्र्याऐंशी स्पर्धा होतात. अनेक खेळाडूंविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळतो. त्यांच्याकडून काही टेक्‍निक शिकायला मिळते. मुंबईच्या धर्तीवरच क्रिकेटचे स्ट्रक्‍चर अन्य जिल्ह्यांत आवश्‍यक आहे.

Web Title: kolhapur news cricket sakal