आता पासपोर्टसाठी दररोज 200 अर्ज स्वीकारणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

कोल्हापूर - शहरात पोस्टाच्या मुख्य कार्यालयात सुरू झालेल्या पासपोर्ट केंद्राला चांगला प्रतिसाद आहे. सुरवातीला 50 पासपोर्ट अर्ज स्वीकारणे आणि देण्याची सूचना होती. मात्र, लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता या पासपोर्ट विभागाचे विभागीय मुख्य अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी ही मर्यादा आता 200 अर्जापर्यंत वाढविली आहे. दररोज 170 ते 200 अर्ज येत असून, लवकरच हे कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू राहील यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली.

अतुल गोतसुर्वे म्हणाले, 'देशात दोनच पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात सर्वांत चांगला प्रतिसाद आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये दररोज 250 पासपोर्ट अर्ज नोंदणी करतो. कोल्हापूरमध्ये दररोज 205 अर्ज नोंदणी करत आहे. देशात 50 केंद्रे आहेत. त्या केंद्रामध्ये 120 ते 130 अर्जच नोंद होत आहेत; पण कोल्हापूरमध्ये 250 ते 300 पर्यंतचे अर्ज नोंद होत आहेत. मुख्य म्हणजे कोल्हापूरसह सांगली, सातारा, कराड येथील लोकांची वेळ आणि पैशाची बचत होत आहे. पासपोर्ट केंद्रातील जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, ते लोकांना सहकार्य करत आहेत. पासपोर्ट हा सामाजिक बदलाचा घटक आहे. जास्तीत जास्त लोकांनी पासपोर्ट काढला पाहिजे, असेही आवाहन गोतसुर्वे यांनी केले.

Web Title: kolhapur news daily 200 form for passport