कोल्हापूर शहरात जागोजागी मरणखड्डे...

डॅनियल काळे 
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - नागाळा पार्कातील राजहंस प्रिंटिंग प्रेसजवळच्या खड्ड्यांनी सख्ख्या भावांचा बळी घेतल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. शहरात या रस्त्यासह अनेक ठिकाणी असे धोकादायक खड्डे, चेंबर, वळणे, उघडी गटारे आहेत. तेथे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. उमा टॉकीज ते फोर्ड कॉर्नर या अरुंद रस्त्यावर अनेक ठिकाणी असे खड्डे आहेत. गटारी उघड्याच आहेत. त्याचबरोबर शहाजी महाविद्यालयासमोरही असा धोकादायक खड्डा आहे; पण महापालिका प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याने दुचाकीस्वारांचा जीव स्वस्त झाल्याचे शहरात चित्र आहे.

कोल्हापूर - नागाळा पार्कातील राजहंस प्रिंटिंग प्रेसजवळच्या खड्ड्यांनी सख्ख्या भावांचा बळी घेतल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. शहरात या रस्त्यासह अनेक ठिकाणी असे धोकादायक खड्डे, चेंबर, वळणे, उघडी गटारे आहेत. तेथे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. उमा टॉकीज ते फोर्ड कॉर्नर या अरुंद रस्त्यावर अनेक ठिकाणी असे खड्डे आहेत. गटारी उघड्याच आहेत. त्याचबरोबर शहाजी महाविद्यालयासमोरही असा धोकादायक खड्डा आहे; पण महापालिका प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याने दुचाकीस्वारांचा जीव स्वस्त झाल्याचे शहरात चित्र आहे.

पार्श्‍वभूमी
शहरात २००९ मध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वानुसार शहर रस्ते विकास प्रकल्पाचे काम करण्यात आले. या प्रकल्पात काही ठिकाणी अर्धवट कामे राहिली आहेत. या कामाबाबत शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांत ओरड होत होती; पण तरीही जाणीवपूर्वक अशा बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, अशा एकेक बाबी आता धोकादायक बनत चालल्या आहेत. आता आयआरबी कंपनी येथून निघून गेली आहे. ही सर्व जबाबदारी महापालिकेलाच घ्यावी लागणार आहे; पण महापालिका प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

बागल चौकाजवळचा अपघात झोन
बागल चौक ते जनता बझार चौक या रस्त्याकडे जाताना डॉमिनोजशेजारी नाल्याला कठडा नसल्याने हे ठिकाण धोकादायक आहे. येथे केव्हाही अपघात होऊ शकतो. 
लोखंडी ग्रिल लावून हे ठिकाण बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला असला, तरी एखादे मोठे वाहन गेले तर हे ग्रिल एका मिनिटात तुटून वाहन नाल्यात पडू शकते. हा नाला उघडाच आहे. नाल्यावर आणखीन थोडा स्लॅब टाकून नाल्याला कठडा बांधण्याची गरज आहे.

एमजे मार्केटसमोरचे गटार
पार्वती टॉकीज ते बागल चौक या रस्त्यावर एमजे मार्केटसमोर नाला साफ करायचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले. स्लॅब टाकून बंद केलेला हा नाला पुन्हा सुरू करायचे काम महापालिकेने केले. पण, येथे एका ठिकाणी उघडे गटार आहे. हे गटारही धोकादायक आहे. येथेही वाहतूक मोठ्या प्रमाणात असते.

बाबूभाई परीख पुलाचे वळण
बागल चौक अथवा राजारामपुरीतून आलेली वाहने बाबूभाई परीख पुलातून वळण घेताना या ठिकाणीही उघडे गटार अपघाताला निमंत्रण देणारे आहे. येथे अनेकदा अपघात झाले आहेत. एक दगडी छपरी गटारावर टाकण्यात आली आहे; पण हे पुरेसे नाही. येथे आणखीन काही उपाययोजना करायला हव्यात.

लक्ष्मीपुरीत डेंजर झोन
उमा टॉकीज ते फोर्ड कॉर्नर हा रस्ता अरुंद आहे. खरेतर या रस्त्याला दुभाजकांचाच मोठा अडथळा आहे. येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. उमा टॉकीजपासून फोर्ड कॉर्नरकडे जाताना डाव्या बाजूला जेथे लक्ष्मीपुरीला जोडणारे अनेक रस्ते मिळतात, तेथे अनेक ठिकाणी उघड्या गटारी आहेत. या उघड्या गटारी अपघाताला निमंत्रण देणाऱ्याच आहेत. रस्त्याची पातळीही वेगवेगळी आहे. त्यामुळे हे ठिकाण म्हणजे अपघातग्रस्त ठिकाण असल्यासारखी स्थिती आहे.

शहाजी कॉलेजसमोरचा खड्डा
दसरा चौक ते शहाजी कॉलेज या रस्त्यावर शहाजी कॉलेजसमोर ड्रेनेजलाईनसाठी असाच एक मोठा खड्डा खणून ठेवला आहे. या खड्ड्याभोवती बांबूचे कुंपण घातले आहे. पण, रात्रीच्या वेळी येथे अंधार असतो. हा खड्डा कोणाच्याही लक्षात येत नाही. आता या अपघातामुळे तरी महापालिकेला जाग येणार आहे का, असा प्रश्‍न या निमित्ताने पडला आहे.

खाटिक समाजाच्या इमारतीजवळचा डीपी धोकादायक
फोर्ड कॉर्नर खाटिक समाजाच्या इमारतीजवळ असलेला वीजपुरवठा यंत्रणेतील डी. पी. कधी तरी खूप मोठ्या आपत्तीचे कारण ठरणार आहे. कारण हा मोठ्या आकाराचा डी.पी. खांबावर नव्हे तर खांबाखाली रस्त्याला टेकून उभा केला आहे. त्याच्या शेजारून सेकंदाला एक वाहन जाते, अशी स्थिती आहे. विशेष हे की धान्य बाजार, लोखंड बाजार, के. एम. सी. वर्कशॉप जवळच असल्याने मोठ्या अवजड वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यालगत एक इंचभरही मागे बसवलेल्या या डीपीला एखादे वाहन धडकले तर विजेच्या धक्‍क्‍याने काय होईल, हे कल्पना करण्यापलीकडे आहे.
याच खांबावर मोठा ट्रॉन्स्फॉर्मर आहे. त्याच खांबावर डी. पी. बसवायला जागा नसल्याने चक्क हा डी. पी. रस्त्यावर दक्षिणेला तोंड करून ठेवला आहे आणि त्याला लागूनच उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, लोखंड बाजारातून येणाऱ्या वाहनांचा मुख्य रस्ता आहे. वाहनचालकाचा जरा जरी अंदाज चुकला तरी डी. पी.ला. धडक बसेल, अशी स्थिती आहे. सिग्नल पडण्याअगोदर फोर्ड कॉर्नर पास करण्यासाठी वाहनधारक या रस्त्यावर वेग वाढवतात. याच डी. पी. जवळ गेल्या वर्षी एक केटरिंग व्यावसायिक ट्रकला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्या वेळी ट्रकचालकाने डी. पी.वर ट्रक धडकण्यापूर्वीच थांबवला होता. या डी. पी.बद्दल लोकांच्या तक्रारी आहेत. दुर्घटनेपूर्वी या डी.पी.चे स्थलांतर होण्याची गरज आहे.

Web Title: kolhapur news dangerous pits on road