धनादेश बाऊन्स वीज ग्राहकांच्या मुळावर...

Electricity
Electricity

कोल्हापूर - महावितरणचे वीज बिल धनादेशाद्वारे भरणाऱ्यांचा धनादेश बाऊन्स झाल्यास साडेतीनशे रुपयांचा दंड भरावा लागतो.  

धनादेश बाऊन्सनंतर वीज बिल वेळेत भरले नाही, तर वीज खंडित होण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागते. यामुळे धनादेशाऐवजी ऑनलाईन वीज बिल भरण्याला ग्राहकांनी प्राधान्य देण्याचे आवाहन ‘महावितरण’ने केले. महावितरणकडे राज्यभरात जवळपास ७ लाख वीज ग्राहक दरमहा वीज बिल धनादेशाद्वारे भरतात. यात घरगुती, कृषी, औद्योगिक, व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे, अनेकदा वीज बिल भरण्याची अंतिम तारीख जवळ आल्यावर एक-दोन दिवस अगोदर ग्राहकांकडून धनादेश दिला जातो.

धनादेश वटण्यासाठी दोन ते चार दिवस जातात, बिल भरण्याची अंतिम तारीख उलटून जाते. त्यानंतर बिल जमा होते; पण दंडाची रक्कम पुढील बिलात येते. अशात अनेकांचे धनादेश खात्यावर पैसे नाहीत किंवा अन्य कोणत्याही तांत्रिक कारणाने बाऊन्स होतात. असे प्रमाण महावितरणकडे जमा होणाऱ्या धनादेशांपैकी दहा हजार धनादेशाचे आहे. 

त्या महिन्यातील बिलाची थकबाकी पुढील बिलात येते, तीही वेळेत भरली नाही तर वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. सहा महिन्यांसाठी धनादेशाद्वारे बिल भरण्याची सुविधा रद्द होते. एखाद्याने धनादेश बाउन्स झाल्यानंतर रक्‍कम दंडासह भरली नाही, तर १८८१ कलम १३८ अंतर्गत दखल पात्र फौजदारी गुन्हा आहे.

काही वीज ग्राहक एकाच वेळी अनेकांच्या बिलाची रकम गोळा करतात. एकूण रकमेचा धनादेश महावितरणला देतात. तो धनादेश बाउन्स झाल्यास संबंधित अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होतो. वीज बिलापोटी दिलेला धनादेश बाउन्स झाला की, ३५० रुपये दंड होतो. असे राज्यातील दहा हजार ग्राहकांना मिळून दरमहा ३५ लाखांचा धनादेश बाउन्स चार्ज लागतो, कोल्हापूर परिमंडलात जवळपास पाच लाखापर्यंत ही रक्कम जाते. याचा लाभ ना ग्राहकाला, ना महावितरणाला अशी स्थिती होते.

टेक्‍नो सॅव्ही सेवा 
कोल्हापूर परिमंडलात जवळपास दीड लाख ग्राहकांचे मोबाईल नंबर महावितरण कंपनीकडे आहेत. सर्वांना वीज बिलाची माहिती मोबाईलवर देण्यात येते. राज्यात ३५ लाख ग्राहक ऑनलाईन बिले भरतात. त्याद्वारे महावितरणकडे ६०० कोटी दरमहा महसूल जमा होतो. ॲपद्वारे नवीन वीज जोडणी घेणे, त्यासाठी अर्ज व वीज वितरणविषयक तक्रारी, सल्ले देता येतात. त्यामुळे या सेवेतून आर्थिक बचत, श्रम वाचविण्यासाठी ग्राहक हिताचा ठरणार आहे. 

महिन्याला २५० जणांवर कारवाई
वीज बिल भरण्यासाठी दिलेला धनादेश बाऊन्स झाल्यानंतर वीज ग्राहकाला उशिरा माहिती मिळते. मागील थकबाकी व चालू महिन्याचे बिल येते, अनेकजण धनादेश बाऊन्स होणाऱ्यांपैकी ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ग्राहक बिल पुढे रोखीने भरतात; पण दोन्ही बिले थकीत ठेवणाऱ्यांपैकी राज्यभरात सुमारे १५०० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होतो. परिमंडलात जवळपास २५० वीज ग्राहकांना या कारवाईला सामोरे जावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com