डेंगीच्या उच्चाटनासाठी ११ पथके

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

कोल्हापूर - शहरातील ३३ वॉर्डमध्ये डेंगीचे रुग्ण आढळल्याने महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. निम्म्या शहरात डेंगीचा फैलाव झाल्याने डेंगीचे उच्चाटन करण्यासाठी २० ते २८ जून या काळात महापालिका साफसफाई व धूर फवारणीची विशेष मोहीम घेणार आहे. 

कोल्हापूर - शहरातील ३३ वॉर्डमध्ये डेंगीचे रुग्ण आढळल्याने महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. निम्म्या शहरात डेंगीचा फैलाव झाल्याने डेंगीचे उच्चाटन करण्यासाठी २० ते २८ जून या काळात महापालिका साफसफाई व धूर फवारणीची विशेष मोहीम घेणार आहे. 

यासाठी वैद्यकीय अधिकारी, सफाई, पवडी कर्मचारी अशा शंभर कर्मचाऱ्यांचा समावेश असणारी ११ पथके तैनात केली जाणार असून, या पथकाकडून एकावेळी स्वच्छतेसह घरोघरी धूर फवारणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागात वैद्यकीय अधिकारी, तसेच आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली गेली आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयांनीही डेंगीचा रुग्ण आढळल्यास महापालिकेला माहिती कळवावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी नोटिशीव्दारे दिला आहे. तसेच ४५० रुग्णालयांना ही नोटीस दिली आहे.

राज्यपातळीवरूनही सूचना
कोल्हापूर शहरातील डेंगीच्या आजाराची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्याचे किटक अधिकारी डॉ. महेंद्र जगताप यांनी आज महापालिकेला भेट देऊन आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांच्याशी चर्चा केली. डेंगीच्या उच्चाटनासाठी शहरात विशेष मोहीत घ्या, जनजागृती करा. डबकी आणि डासोत्पती केंद्रे नष्ट करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. आरोग्याधिकारी डॉ. पाटील यांनीही महापालिकेकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

या परिसरात आढळले रुग्ण
शहरातील ८१ पैकी ३३ वॉर्डमध्ये डेंगीच्या रुग्णांची स्थिती गंभीर आहे. सदरबाजार, जुना बुधवार पेठ, मंगेशकरनगर, भक्ती पूजानगर, जवाहरनगर, सरनाईक वसाहत. कनाननगर, पी. आर. हॉस्पिटल, टेंबलाईवाडी, उचगाव नाका,  महाडिक माळ, फिरंगाई, न्यू शाहूपूरी, कदमवाडी, शहाजी वसाहत, ताराबाई पार्क, चिले कॉलनी, संभाजीनगर एनसीसी भवन, शिवाजी पार्क, सिद्धार्थनगर, लाईनबाजार, जुना वाशीनाका, शहाजी वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, साळोखेनगर, रविवार पेठ, कारंडे मळा, साने गुरुजी वसाहत, देवकर पाणंद, लक्ष्मीपुरी, दुधाळी, गंगावेस, मंगळवार पेठ, शास्त्रीनगर, सागरमाळ, भोसले पार्क, महालक्ष्मीनगर, कळंबा जेल परिसर, राजारामपुरी, कावळा नाका या भागात विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

Web Title: Kolhapur News Dengue in city