विमानसेवेस पंधरवड्यात कच्चा परवाना - महाडिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  कोल्हापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांत कच्चा परवाना (प्री ऑपरेशन लायसन्स) मिळणार आहे. नागरी विमान संचालनालय आणि भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या प्रात्यक्षिकांसह इतर कागदपत्रांची माहिती घेतली. आठवड्यात त्यांचा अहवाल ते दिल्लीला पाठवणार आहेत. पुढील पंधरा दिवसांत मंजुरी मिळेल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी येथे दिली.

कोल्हापूर -  कोल्हापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांत कच्चा परवाना (प्री ऑपरेशन लायसन्स) मिळणार आहे. नागरी विमान संचालनालय आणि भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या प्रात्यक्षिकांसह इतर कागदपत्रांची माहिती घेतली. आठवड्यात त्यांचा अहवाल ते दिल्लीला पाठवणार आहेत. पुढील पंधरा दिवसांत मंजुरी मिळेल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी येथे दिली. आठवड्यातून दोन दिवस सकाळी आठ वाजता मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर विमानतळ विस्तारीकरणाच्या २७४ कोटींच्या कामाची प्रक्रिया येत्या तीन ते चार महिन्यांत सुरू होईल आणि पुढील तीन वर्षांत ते काम पूर्ण होईल, असे नियोजन झाले आहे. यामध्ये विमानतळाची इमारत, एक किलोमीटरची वाढीव धावपट्टी, टॉवर, अग्निशमन बंब, रुग्णवाहिका यांचा समावेश असेल, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.

वाहतूक परवाना रद्द केल्यामुळे २०११ पासून कोल्हापूरचे विमानतळ वाहतुकीसाठी बंद झाले आहे. याच दरम्यान २७४ कोटींचा विस्तारित विमानतळाचा आराखडाही मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात विमानसेवा सुरू नाही आणि विस्तारीकरण अशी कोंडी होती. या बाबत श्री. महाडिक यांनी संसदेत प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे नागरी विमान संचालनालय आणि भारतीय विमान प्राधिकरणाचे अधिकारी आज संयुक्त पाहणीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यांनी विमानतळाची पाहणी केली. काही महत्त्वाची कागदपत्रे पाहिली. यानंतर सायंकाळी खासदार महाडिक यांच्या कार्यालयात त्यांची बैठक झाली. येथे खासदारांनी सविस्तर माहिती घेऊन पत्रकार परिषद घेतली.

महाडिक म्हणाले, ‘‘संयुक्त पाहणीनंतर आठवड्यात हा अहवाल दिल्लीत पोचेल. त्यानंतर आठवड्यात मान्यता मिळेल. ही मान्यता म्हणजे कच्चा परवाना असेल. त्यानंतर पहिले फ्लाइट ‘टेक ऑफ’ होईल. त्यानंतर पक्का परवाना देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे आता विमानतळावरील सेवा सुरू होण्यास फार मोठा अडथळा राहणार नाही. तेथून पुढे विमानसेवा सुरळीत होण्यासाठी डेक्कन एअरलाइन्सकडे प्रयत्न केले जातील. परवान्याचा प्रश्‍न निकाली निघाल्यामुळे आता विस्तारीकरणाला सुरवात होईल. यासाठीचे कन्सल्टंट आणि इंजिनिअर नेमले आहेत. तीन महिन्यांत ते विकास आराखडा (डीपीआर) तयार करतील. त्यानंतर महिन्यात निविदा प्रक्रिया होईल. साधारण तीन-चार महिन्यांत विस्तारीकरणाचे काम सुरू होईल. १५९ कोटी हे रन-वेसाठी आहेत. साधारण एक किलोमीटरचा हा वाढीव रन-वे असेल. टर्मिनल  बिल्डिंग, एटीसी टॉवर अशा सर्व सुविधा होतील.’’

पथकाकडून आजही पाहणी
नागरी विमान संचालनालय आणि भारतीय विमान प्राधिकरणाचे एस. एस. बालन, कृष्णा कुमार, दीपक खोब्रागडे, मानसिंग माने, पूजा मूल, राजेश अय्यर, सर्वोत्ता सक्केना, मुकेश शर्मा आदी अधिकारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. उद्याही ते विमानतळाची पाहणी करणार आहेत.

दर बुधवार-शुक्रवारी फ्लाइट
दर बुधवारी आणि शुक्रवारी अशी दोन दिवस कोल्हापुरात फ्लाइट येईल. यासाठी मुंबईतील सकाळी आठची वेळ निश्‍चित झाली आहे. विमानसेवा सुरू करण्यासाठी आता डेक्कन एअरकडे पाठपुरावा सुरू केला आहे; मात्र विमानसेवा केव्हा सुरू होईल, हे आताच सांगता येणार नाही. कारण ‘टेक ऑफ’च्या अनेक तारखा झाल्या; मात्र ‘टेक ऑफ’ काही झालेले नाही, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले.

पंतप्रधानांची भेट घेणार
कोल्हापूर विमानतळ ‘उडान’ योजनेतील आहे. त्यासाठी आवश्‍यक पाठपुरावा सुरू असतानाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, म्हणून कोल्हापूर, नाशिक, नांदेड, सोलापूर आणि जळगावच्या खासदारांनी एकत्रितपणे पंतप्रधान मोदी यांची भेट मागितली आहे. साधारण नोव्हेंबरच्या दहा तारखेपर्यंत ही भेट मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच येथील कामाला गती आल्याचेही खासदार महाडिक यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Dhananjay Mahadik Press