साठ वर्षे मधुमेहाशी गोडीगुलाबी...

सुधाकर काशीद
सोमवार, 15 जानेवारी 2018

मधुमेहाला घाबरून तो काही बरा होणार नाही. मधुमेहाशीच गोडीगुलाबीने म्हणजे व्यवस्थित पथ्यपाणी सांभाळून राहिले, तर मधुमेह त्याची पातळी सोडत नाही. यासाठी रोज चालण्याचा व्यायाम आवश्‍यक आहे आणि चहातील साखर बंद हा एक उपाय आहे.
- गणपती सुतार

कोल्हापूर - मधुमेह झाला हे कळायचा किंवा काही कारणांनी रक्तात साखरेचे प्रमाण वाढले, असा रिपोर्ट द्यायचा अवकाश संबंधित माणूस अक्षरशः हादरून जातो. आपल्याला मधुमेह झाला, या विचारानेच तो आपले उरले सुरले स्वास्थ्यही हरवून बसतो; पण गेली साठ वर्षे मधुमेहाशी गोडीगुलाबीने साथ करत येथील गणपत आबाजी सुतार आजही ठणठणीत आहेत. केवळ ठणठणीत नव्हे, तर उद्या बरोबर शंभर वर्ष पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मधुमेह झाला ठिक आहे; पण आपण व्यवस्थित राहिलो, तर मधुमेहाला का म्हणून घाबरायचे हा त्यांचा एकशे एकाव्या वर्षीचा सवाल आहे.

मधुमेहाशी साठ वर्षे गोडीगुलाबीने राहणाऱ्या गणपत सुतारांचे १०० वर्षांचे आयुष्यही गोड आहे. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९१८ चा असून, शाहूपुरी पाचव्या गल्लीत ते राहतात. संस्थान काळात पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा उत्तीर्ण होऊन संस्थानच्या मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात सेवेत लागले. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम (इलेक्‍ट्रिकल) खात्यात वर्ग झाले. या गणपत सुतारांचे वैशिष्ट्य असे की मुंबईत पंतप्रधान किंवा अन्य कोणीही व्हीआयपी येणार असतील, तर त्यांच्या सभेवेळी विद्युतपुरवठा खंडित होणार नाही, सभेत माईक बंद पडणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी त्यांची.

एखादा व्हीआयपी लिफ्टने एखाद्या इमारतीत जाणार असेल, तर त्या लिफ्टची खातरजमा करण्याचे काम गणपत सुतारांचे. मुंबईत १९६० रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले व एरॉस थिएटरजवळील एका इमारतीत त्यांच्या मित्राच्या घरी ते जाणार होते. पंतप्रधान या ठिकाणी जाणार म्हटल्यावर तातडीने या इमारतीची लिफ्ट तपासण्यात आली; पण या लिफ्टमधून पंतप्रधानांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीने जाणे सुरक्षित नाही, असा अहवाल सुतार यांनी दिल्यामुळे नेहरूंची त्या मित्राच्या घरची भेट रद्द करावी लागली. अशा वेगळ्या जबाबदारीच्या कामातील सुतार यांना त्यांच्या वयाच्या ४० व्या वर्षी मधुमेहाने गाठले. अर्थात मधुमेह म्हटला की डॉक्‍टर भीती घालतात, अज्ञानी स्नेही मित्र त्या भीतीत भर घालतात आणि मधुमेह झाल्याचे स्वास्थ्य बिघडून टाकतात; पण गणपती सुतार यांनी मधुमेह सहजपणे स्वीकारला. रोज आठ ते दहा किलोमीटर चालायचा व्यायाम व चहातील साखर पूर्ण बंद म्हणजे बंद एवढेच पथ्य त्यांनी आजअखेर पाळले. या पथ्याशी त्यांनी तडजोड केली नाही आणि मधुमेहाची रोज उठता बसता चिंता केली नाही.

 आज शंभरावा वाढदिवस
उद्या ते १०१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. नजर चांगली आहे, ऐकायला व्यवस्थित येते, स्वतः कोणाचाही आधार न घेता फिरता येते, नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनचे सारे त्यांना आजही बारीक-सारीक तपशिलासह आठवते. उद्या शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिरात त्यांचे कुटुंबीय व मित्र परिवाराने त्यांच्या वाढदिवसाचे आयोजन केले आहे.

Web Title: Kolhapur News Diabetics Patient Ganpat Sutar Special Story