अपंग शिष्यवृत्तीची अडथळ्याची शर्यत

शिवाजी यादव
सोमवार, 3 जुलै 2017

निधी येऊनही वाटप अडकले - अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका; विद्यार्थ्यांची होणार कसरत

कोल्हापूर - अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते; मात्र जिल्ह्यातील साडेचार हजार लाभार्थींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया आहे. ती पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे एकच लिपिक आहे. अशात अनेक विद्यार्थ्यांचे खाते नंबर चुकीचे असल्यापासून इतर माहिती अपुरी आहे. यावर पर्याय काढण्यासाठी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून तांत्रिक कसरती सुरू असूनही पर्याय निघालेला नाही.

परिणामी, अपंगांची शिष्यवृत्ती म्हणजे ‘सरकारी काम अन्‌ सहा महिने थांब’ अशी अवस्था झाली आहे. 

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी शासनाकडून यंदा जवळपास ५० लाखांचा निधी आला आहे. या निधीतून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या अपंग विध्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. ३०० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंत हा लाभ दिला जातो. त्यासाठी शाळा, महाविद्यालय, अपंग शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती, त्याचे बॅंक खाते क्रमांक भरून तसा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवावा लागतो. असे जवळपास साडेचार हजारांवर प्रस्ताव गतवर्षी समाजकल्याण विभागाकडे आले आहेत. त्यानंतर शिष्यवृत्तीचा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा झाला. अखेर निधी आला तोपर्यंत गतवर्षीचे शैक्षणिक वर्षे संपले होते. 

समाजकल्याण विभागातील एका लिपिकाकडे शिष्यवृत्ती वाटपाचे काम आहे. या कामासाठी अपंग शाळातील शिक्षक मदतीला देण्यात येतात, असेही सांगण्यात येते; मात्र अपंग शाळातील शिक्षकांनी त्यांचे अध्यापनाचे काम करावे की, समाजकल्याणचे काम करावे, असाही प्रश्‍न आहे. प्रत्यक्ष शिष्यवृत्ती कामाच्या वाटपाला सुरवात झाली. शाळाकडून आलेल्या प्रस्तावात अनेक मुलांनी खाते क्रमांक चुकीचा टाकला आहे. यामुळे शिष्यवृत्ती रक्कम खात्यावर भरताना अडचणी येत आहेत. यात अनेकांची खाती केडीसीसी बॅंकेत आहेत, तर काहीची राष्ट्रीयीकृत बॅंकेत आहेत. यातून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र नोंदीचे काम करावे लागते. यामुळे विलंब होत आहे.  

वास्तविक समाजकल्याण विभागातील कर्मचारी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत मिळावी, यासाठी जरूर प्रयत्नशील आहे; मात्र तसे प्रयत्न काही शाळांच्या पातळीवर झालेले नाहीत. 

‘डीडी’चा पर्याय रखडला
गतवर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ यंदाच्या शैक्षणिक वर्षात देण्यात येत आहे. तोही वेळेत मिळेल की नाही याबाबत शंका आहे. अखेर शाळांच्या नावे डीडी काढण्याचा पर्याय पुढे आला आहे. डीडी शाळांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर शाळांनी अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वाटावी, असा पर्याय पुढे आला; मात्र त्यावरही अंतिम निर्णय झाला नसल्याने शिष्यवृत्तीचा विलंब आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

Web Title: kolhapur news Disability Scholarship Obstacle Race