डॉल्बी उभा करताना पकडण्यासाठी पथके

राजेश मोरे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - मोकळ्या मैदानात अगर आडोशाला डॉल्बी उभा करणाऱ्यांनो सावधान... तुमच्यावर आता पोलिसांचा वॉच राहणार आहे. शहर परिसरात विसर्जन मिरवणुकीच्या मध्यरात्रीपर्यंत दोन पथकांकडून अशा ठिकाणांची तपासणी होणार आहे. यात जर डॉल्बी उभा करताना कोणी सापडला तर प्रथम सिस्टीम जप्त करून डॉल्बीसह ट्रॅक्‍टरमालक, चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

कोल्हापूर - मोकळ्या मैदानात अगर आडोशाला डॉल्बी उभा करणाऱ्यांनो सावधान... तुमच्यावर आता पोलिसांचा वॉच राहणार आहे. शहर परिसरात विसर्जन मिरवणुकीच्या मध्यरात्रीपर्यंत दोन पथकांकडून अशा ठिकाणांची तपासणी होणार आहे. यात जर डॉल्बी उभा करताना कोणी सापडला तर प्रथम सिस्टीम जप्त करून डॉल्बीसह ट्रॅक्‍टरमालक, चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची हाक पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी तालीम मंडळांच्या बैठका घेतल्या. गणेशोत्सवाला उत्साहात सुरवात झाली; मात्र गेल्या तीन दिवसांत शहरातच नव्हे, तर जिल्ह्यात एकही डॉल्बी पोलिसांनी लावू दिला नाही. राजारामपुरीतील आगमन मिरवणूक पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. येथील काही मंडळांनी डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मध्यरात्रीपर्यंत मिरवणूक जैसे थै ठेवली; मात्र तरीही शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी एकाही मंडळाला डॉल्बी लावू दिला नाही. हा चाचणी पेपर पोलिस उत्तीर्ण झाले. आता विसर्जन मिरवणुकीचा वार्षिक पेपर त्यांना द्यावयाचा आहे. त्याची जय्यत तयारी पोलिसांनी केली आहे. विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांची आधी दोन तीन दिवस तयारी सुरू असते. ट्रॉलीवर डॉल्बी उभा करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू असते. यापूर्वी ही मंडळे हे काम तालीम मंडळाच्या दारात अगर परिसरात करत होती. त्यामुळे त्याची माहिती पोलिसांना मिळत होती; मात्र सध्या कार्यकर्तेही हुशार झाले आहेत. त्यांनी आता डॉल्बी उभा करण्याचे काम एखाद्या मोकळ्या मैदानात, उपनगरातील आडोशाचे ठिकाण यासाठी निवडले आहे.

विसर्जन मिरवणुकीच्या वार्षिक पेपरसाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी २० पोलिस कर्मचाऱ्यांची दोन विशेष पथके तयार केली आहेत. त्यांच्याकडून आता विसर्जनाच्या दिवशी सकाळपर्यंत गस्त घालण्यात येणार आहे.

शेंडापार्क, आयसोलेशनचा माळ, तपोवन, फुलेवाडी परिसर, रिंग रोड, गांधी मैदान, दुधाळी मैदान, उत्तरेश्‍वर परिसर, लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा, अंबाई टॅंक, शिवाजी पेठ, सानेगुरुजी, राजोपाध्येनगर, मंगेशकरनगर, बेलबाग आदींसह मुख्य मंडळांच्या परिसरावर वॉच ठेवला जाणार आहे. ज्या ठिकाणी डॉल्बी उभारण्यात येत असेल तो जागेवरच जप्त केला जाणार आहे. त्यानंतर प्रथम डॉल्बीसह ट्रॅक्‍टरमालक, चालकांवर तातडीने कारवाई होणार आहे. त्यानंतर संबंधित मंडळावर कारवाई केली जाणार आहे.

पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार दोन पथके तैनात केली आहेत. शहर व परिसरातील मोकळ्या मैदानावर व निर्जन स्थळाचा आधार घेत डॉल्बी उभारण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई केली जाणार आहे. 
- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उपअधीक्षक.

Web Title: kolhapur news Docking squad while catching Dolby