इचलकरंजी: अपघातात वृद्ध डॉक्टरचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

डॉ.रामचंद्र फडणीस यांनी वैद्यकिय पदवी घेतल्यानंतर येथील नगरपालिकेच्या आयजीएम रूग्णालयामध्ये रूजू झाले. त्यांनी या रूग्णालयात डॉक्‍टर सेवा ही ईश्‍वर सेवा समजून अनेक रूग्णांची सेवा, शुश्रुषा करीत अनेकाना जीवनदान दिले.

इचलकरंजी : येथील स्टेशन रोडवरील व्यंकटेश कॉलनीच्या कॉर्नरजवळ भरधाव स्कूल बसने मॉर्निंग वाकिंग करत असलेल्या वयोवृध्द डॉक्‍टरला जोराची धडक दिली. या धडकेनंतर बसचे चाकचे अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. डॉ. रामचंद्र शंकर फडणीस (वय 70, रा.हॉटेल राजदुत रोड, जवाहरनगर, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. ते येथील नगरपालिकेच्या आयजीएम रूग्णालयाचे सेवानिवृत्त वैद्यकिय अधिकारी आहेत. हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

डॉ. रामचंद्र फडणीस यांनी वैद्यकिय पदवी घेतल्यानंतर येथील नगरपालिकेच्या आयजीएम रूग्णालयामध्ये रूजू झाले. त्यांनी या रूग्णालयात डॉक्‍टर सेवा ही ईश्‍वर सेवा समजून अनेक रूग्णांची सेवा, शुश्रुषा करीत अनेकाना जीवनदान दिले. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आपुलीची भावना निर्माण झाली होती. ते गेल्या काही वर्षापूर्वी या रूग्णालयातून सेवानिवृत्त झाले असून, शहरातील जवाहरनगरातील हॉटेल राजदुत रोडवर राहत आहेत.

शहरातील स्टेशन रोडवर डॉ.श्री फडणीस नेहमी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निग वाकिंगसाठी जात असे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते रोडवरील व्यंकटेश कॉलनी जवळ मॉर्निग वाक करीत जात होते. त्यावेळी त्यांना पाठीमागून भरधाव येणाऱ्या स्कूल बसने जोराची धडक दिली. या धडकीने ते उडून रस्त्यावर पडल्याने बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने जागीच ठार झाले. या अपघातामुळे स्टेशन रोडवरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.
या अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी त्वरीत दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, मृतदेह मरणोत्तर तपासणीसाठी आयजीएम रूग्णालयाकडे पाठविला. विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत केली. डॉ.फडणीस अपघातामध्ये ठार झाल्याची माहिती समजताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि सहकाऱ्यांनी आयजीएम रूग्णालयात मोठी गर्दी केली होती. या अपघाताबाबत येथील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त स्कूल ताब्यात घेतली असून, ही बस येथील सांगली रोडवरील एका शिक्षण संस्थेची आहे.

Web Title: kolhapur news doctor dead in accident