डॉल्बी लावाल तर अडचणीत याल! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

कोल्हापूर - ""गणेशोत्सवात डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण कराल तर अडचणीत याल,'' असा इशारा विविध मंडळांना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज पत्रकारांबरोबर बोलताना दिला. गेल्या वर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या 16 मंडळांना बजावलेल्या नोटिसांबाबत ते बोलत होते. 

कोल्हापूर - ""गणेशोत्सवात डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण कराल तर अडचणीत याल,'' असा इशारा विविध मंडळांना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज पत्रकारांबरोबर बोलताना दिला. गेल्या वर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या 16 मंडळांना बजावलेल्या नोटिसांबाबत ते बोलत होते. 

नांगरे-पाटील म्हणाले, ""गतवर्षीप्रमाणे यंदाही पोलिस प्रशासनातर्फे डॉल्बीबाबत तालीम मंडळांच्या प्रबोधनाची मोहीम हाती घेतली आहे. उत्सवात तालीम मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ध्वनिप्रदूषण करू नये. नियमांचे पालन करावे. गुन्हे दाखल झाल्यास तरुणांचे शैक्षणिक भवितव्याचे नुकसान होऊ शकते. याबाबत पालकांनीही दक्ष राहणे आवश्‍यक आहे. उत्सव काळात कायदा-व्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी परिक्षेत्रात बैठकांचे नियोजन केले आहे. त्याची सुरवात 3 ऑगस्टपासून बारामती येथून होणार आहे. त्यानंतर 4 ला जुन्नर, 9 कऱ्हाड, 10 सातारा, 16 मिरज, 18 इस्लामपूर, 19 ऑगस्टला कोल्हापुरात बैठक घेण्यात येईल. या बैठकीत डॉल्बीबाबत तालीम मंडळांचे प्रबोधन करून पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाईल.'' 

ते म्हणाले, ""पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्ह्यातील गुंडांवर तातडीने कारवाईचे, अवैध व्यवसायिकांवर हद्दपारीच्या कारवाईचे, मिरवणुकीत मद्याचा वापर होणार नाही याची काळजी घेण्याचे, उत्सव काळात दहशतवादी कारवायांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. "ए' ग्रेड पोलिस ठाण्यांची गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षकांमार्फत दुसरी बैठक घेतली जाईल. बैठकीत पोलिस अधिकारी, कर्मचारी, महापालिका, प्रदूषण महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचा समावेश असेल.'' 

पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी 
ऑन ड्यूटी पोलिसांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत नांगरे-पाटील म्हणाले, ""दिवसेंदिवस पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे. गृह विभागाने आता पोलिस प्रशासनाच्या दैनंदिन खर्चातूनच 45 वयापेक्षा जास्त असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांनी घ्यावा. शारीरिक तंदुरुस्तीसाठी 5 व 6 ऑगस्ट या दोन दिवशी पन्हाळा-विशालगड अशा परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांबरोबर पदभ्रंतीचा उपक्रम राबविला जाणार आहे.'' 

गटारी अमावास्येनिमित्त परिक्षेत्रात एकाच वेळी केलेल्या नाकाबंदीत वाहतूक निमयांचे उल्लंघन करणाऱ्या 181, तर 134 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. 

क्षेत्र वाहतूक नियमांचा भंग मद्यपी वाहनचालक 
सांगली 58 31 
सोलापूर ग्रामीण 14 25 
सातारा 33 39 
कोल्हापूर 33 07 
पुणे ग्रामीण 43 32 

Web Title: kolhapur news Dolby vishwas nangare patil