अराजकतेसाठी सोशल मीडियाचा वापर - डॉ. जयदेव डोळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

कोल्हापूर - ‘सोशल मीडियाचा वापर करून वेगवेगळे पक्ष लोकांना खोटे बोलायला व खोटे पचवायला भाग पाडत आहेत. चिथावणीखोर मजकुरातून समाजाला बिथरवले जात आहे. हे अराजकतेचे चित्र आहे. असा खोटेपणावर उभारलेला सोशल मीडिया लोकशाहीसमोरील सर्वांत मोठे संकट आहे,’ असे मत माध्यम अभ्यासक डॉ. जयदेव डोळे यांनी व्यक्त केले.  

कोल्हापूर - ‘सोशल मीडियाचा वापर करून वेगवेगळे पक्ष लोकांना खोटे बोलायला व खोटे पचवायला भाग पाडत आहेत. चिथावणीखोर मजकुरातून समाजाला बिथरवले जात आहे. हे अराजकतेचे चित्र आहे. असा खोटेपणावर उभारलेला सोशल मीडिया लोकशाहीसमोरील सर्वांत मोठे संकट आहे,’ असे मत माध्यम अभ्यासक डॉ. जयदेव डोळे यांनी व्यक्त केले.  
राजर्षी शाहू मेमोरिअल ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या शाहू व्याख्यानमालेत ‘प्रसार माध्यम’ या विषयावर ते बोलत होते. प्रा. डॉ. प्रकाश पवार अध्यक्षस्थानी होते.   

डॉ. डोळे म्हणाले, ‘‘प्रसारमाध्यमांना घटनेच्या चौकटीत राहून वृत्तसंपादन करावे लागते. त्यामुळे येथे सरसकट खोटेपणाला वाव नसतो, विश्‍लेषणात्मक बातम्या, टीका करणाऱ्या बातम्याला मर्यादा आल्या, सोयीचा मजकूर प्रसिद्ध होणे मुश्‍कील होते, तेव्हा संकेतस्थळाचा पर्यायी माध्यम म्हणून वापर सुरू झाला, व्हॉटसअपसारखे माध्यमही हाताशी आले. तेव्हा मास मीडिया विरुद्ध सोशिल मीडिया असे चित्र निर्माण झाले. तसा त्याचा वापर राजकीय अंगाने होऊ लागला.’’ 

ते म्हणाले, ‘‘सोशल मीडियाला कसलेच ताळतंत्र नसल्याने कोणी काहीही मजकूर प्रसारित करते. ज्याला गल्लीत मित्र नाहीत, त्यांचे हजारो फॉलोअर्स फेसबुकवर आहेत. अशी एकाकी निराश माणसं हेरून त्यांना चिथावणेचे बळी केले जात आहे. अमुक विचारांचा माणूस म्हणजे राष्ट्रदोही, असेही बिंबवले जाते. त्यातून वाढणारी तेढ जिवघेणी ठरते. सोशल मीडियातून येणाऱ्या फेक न्यूजद्वारे गरिबांना गरिबांविरुद्ध झुंजविण्यासाठीचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते, हे भयंकर आहे.’’

मोबाईलपुरती लोकशाही 
पंतप्रधान मोजक्‍याच पत्रकारांशी कधीतरी बोलतात, त्यांचे मंत्री ट्विटरद्वारे, फेसबुकवरून महत्त्वाचे निर्णय सांगतात, त्यांचे ट्विटर फक्त ज्यांच्या हाती अँड्रॉईड आहे, अशांपैकी मोजक्‍यांना कळते. इतरांपर्यंत निर्णय समजत नाही. त्यामुळे लोकशाही मोबाईलपुरती शिल्लक राहते की काय, अशी शंका येते असेही डॉ. डोळे यांनी सांगितले.

फेक न्यूजनेच गांधींचा खून   
महात्मा गांधींचा खून हा फेक न्यूजमुळेच झाला. त्यांनी हिंदू-मुस्लिम शांततेसाठी उपोषण केले; मात्र कोणीतरी महात्मा गांधींनी ५५ कोटी पाकिस्तानला देण्यासाठी उपोषण केल्याची बातमी पसरविली. त्यानंतर त्यांचा खून झाला, असेही डॉ. डोळे यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Dr Jaydev Dole comment