ई-फार्मसीच्या विरोधात विक्रेते रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

कोल्हापूर - ई-फार्मसीच्या विरोधात आज जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने बंद ठेवून औषध विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. तेथे अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ई-फार्मसीला विरोध असल्याच्या भावना कळविण्याचे आवाहन राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सहसचिव व कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केले.

कोल्हापूर - ई-फार्मसीच्या विरोधात आज जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने बंद ठेवून औषध विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. तेथे अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ई-फार्मसीला विरोध असल्याच्या भावना कळविण्याचे आवाहन राज्य केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सहसचिव व कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केले.

अखिल भारतीय औषध विक्रेत्यांच्या संघटनेतर्फे औषधांच्या ऑनलाईन विक्री विरोधात आज देशव्यापी बंद पुकारला होता. त्याला जिल्ह्यात चांगला पाठिंबा मिळाला. दुकाने बंद ठेवून औषधविक्रेते सकाळी दहाच्या सुमारास व्हीनस कॉर्नर येथील असोसिएशनच्या कार्यालयाजवळ जमले. तेथून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सुभाष रोडवरील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तेथे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चात ‘ई-फार्मसीला विरोध’ दर्शविणारे फलक होते. मूक मोर्चा असल्यामुळे कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. मात्र, मागण्यांचे फलक मोर्चात स्पष्ट दिसत होते.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये असल्यामुळे नायब तहसीलदारांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. बंदमुळे रुग्णांना अडचणी सहन कराव्या लागल्या. मात्र, पर्यायी यंत्रणा उभी करण्यात आल्याने गंभीर रुग्णांना दिलासा मिळाला.

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) काही औषधांच्या ऑनलाईन विक्रीला मान्यता देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. डॉक्‍टरांनी रुग्णाला लिहून दिलेली औषधांची चिठ्ठी अपलोड करावी लागणार आहे. त्याला मान्यता दिल्यानंतरच त्या औषधाची विक्री करण्याची यंत्रणा राज्यात उभारली जात आहे. याबाबतचे परिपत्रक राज्यातील सर्व सहआयुक्तांना पाठविण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर देशव्यापी औषध विक्री बंद आंदोलन पुकारण्यात आल्याचेही शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यवसाय बंद करावा, नार्कोटिक्‍स ड्रग्ज, गर्भपाताच्या गोळ्या, नशेची औषधे यांची विक्री रोखावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सरकार देशभरात ई-फार्मसी, ई-पोर्टल सुरू करण्याच्या योजना आखत असून त्याला विरोध असल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.  शिष्टमंडळात अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे कार्यकारिणी सदस्य दिलीप कदम, कोल्हापूर असोसिएशनचे सचिव शिवाजी ढेंगे, उपाध्यक्ष संजय शेटे आणि किरण दळवी, खजानिस अशोक बोरगावे, सहसचिव सचिन पुरोहित, संघटन सचिव प्रल्हाद खवरे यांच्यासह पदाधिकारी यांचा समावेश होता.

पर्यायी यंत्रणेमुळे दिलासा
या आंदोलनामुळे शहरातील औषध दुकाने बंद राहणार असल्याची शक्‍यता गृहीत धरून रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील निवडक ठिकाणी औषधांची दुकाने सुरू ठेवण्यात आली. कोल्हापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन संपात सहभागी होताना जिल्ह्यातील काही भागात निवडक औषध दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहरातील मोठ्या हॉस्पिटलची औषध दुकाने सुरू राहिली.

Web Title: kolhapur news e-pharmacy oppose sailer on road