चला, पर्यावरणपूरक दिवाळी करू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - चला, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करू या...असे आवाहन यंदा मोठ्या प्रमाणावर विविध माध्यमांतून सुरू झाले आहे. चायना मेड वस्तूंना फाटा देताना स्थानिक हस्तकारागिरांना पाठबळ दिले जात आहे. दरम्यान, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणाऱ्या मुलांसाठी यंदाही निसर्गमित्र संस्थेतर्फे निसर्ग सहलीचे आयोजन केले जाणार आहे.

कोल्हापूर - चला, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करू या...असे आवाहन यंदा मोठ्या प्रमाणावर विविध माध्यमांतून सुरू झाले आहे. चायना मेड वस्तूंना फाटा देताना स्थानिक हस्तकारागिरांना पाठबळ दिले जात आहे. दरम्यान, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणाऱ्या मुलांसाठी यंदाही निसर्गमित्र संस्थेतर्फे निसर्ग सहलीचे आयोजन केले जाणार आहे.

हस्तकारागिरांना बळ
दिवाळीनिमित्ताने कोल्हापूर आणि परिसरातील हस्तकारागिरांना गांधीनगर येथे मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पंधरा ते सतरा ऑक्‍टोबर या काळात स्वामी देव प्रकाश हॉल (स्वामी सर्वानंद स्कूल आवार) येथे हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. ‘आर्ट ऑफ इंडिया’ या नावाने प्रदर्शन होईल. त्यात विशेष मुलांनी दिवाळीसाठी तयार केलेल्या विविध पर्यावरणपूरक आणि सजावटीच्या वस्तूंचे स्टॉल असतील. विविध हस्तकलाकृतींबरोबरच परिसरातील महिला बचत गटांनाही फराळासाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. इच्छुकांनी प्रदर्शनस्थळी शनिवारी (ता. १४) सायंकाळी पाच ते आठ या वेळेत संपर्क साधावा.

चला, मातीत मळू या...!
शहरात आता अनेक ठिकाणी माती दिसेनाशी झाली आहे. मातीचा पायाला स्पर्श होणेही मुश्‍कील झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही वर्षांत मुलांसाठी किल्ले बनवण्याची संकल्पना व्यापक होत आहे.

मुलांनी मातीत मनसोक्त खेळताना त्यांच्यातील सर्जनशीलतेलाही प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य शौर्याची माहितीही त्यांना व्हावी, या उद्देशाने विविध किल्ले यंदाही साकारले जाणार आहेत. त्यासाठी सैनिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बाजार पेठेत उपलब्ध आहेत. काही ठिकाणी लाकडी सजावटीच्या वस्तूही उपलब्ध आहेत. 

आवाज करणाऱ्या बंदुका
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करताना यंदा केवळ आवाज निर्माण करणाऱ्या बंदुकाही बाजार पेठेत उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही. त्याशिवाय विविध रंगांची उधळण करीत पाहिजे तितक्‍या वेळेपर्यंत वाजणारे पर्यावरणपूरक फटाकेही उपलब्ध आहेत. त्याच्याही पुढे जाऊन यंदा असे फटाके भाड्यानेही मिळणार आहेत.

सौर आकाश कंदील
येथील निसर्गमित्र संस्थेने यंदाही दिवाळीसाठी सौर आकाश कंदील उपलब्ध केले आहेत. त्याशिवाय फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणाऱ्या मुलांसाठी निसर्ग सहलही होणार आहे. सौर आकाश कंदीलसाठी  संस्थेच्या दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय (साईक्‍स एक्‍स्टेन्शन) येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

Web Title: Kolhapur News Eco-friendly Diwali celebration